कपिल केकत
गोंदिया : गोड पदार्थ खाल्ल्याने जंत होतात असे सांगितले जात असून जंतांची समस्या लहान मुलांमध्ये सर्वाधिक असते असे दिसूनही येते. यासाठीच आरोग्य विभागाकडून शाळांमध्ये जंतनाशक गोळ्या वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊ घातल्या जातात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद पडल्या असून यामुळे शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप रखडले आहे. विशेष म्हणजे, जंतांचा त्रास हा लहान मुलांमध्येच असतो असे नसून मोठ्यांनाही जंतांचा त्रास होऊ शकतो. यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष अभियान राबवून गोळ्यांचे वाटप केले जाते. त्यानुसार यंदाही हत्तीरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत सर्वेक्षण करून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ही गोळी दिली जात नसून त्यापुढे सर्वांसाठी ४०० एमजीची गोळी घेता येते. तसेच वर्षांतून एकदा तरी ही गोळी खावी असेही सांगितले जाते.
--------------------------------
सर्वांनाच घेता येते गोळी
जंतांचा त्रास फक्त लहान मुलांनाच होतो असे नाही. पोटातील अन्न व्यवस्थित पचन होत नसल्यास कुणालाही जंतांचा त्रास होऊ शकतो. यामुळेच आरोग्य विभागाकडून घरोघर सर्वेक्षण करून वर्षातून एकदा जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाते.
-----------------------------
काय आहे जंतदोष ?
जंत म्हणजे पोटात तयार होणारे किडे किंवा त्यांना किरीम (कृमी) असे ही म्हटले जाते. जंतांमुळे रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होते व त्यालाच एनिमिया म्हणतात. शिवाय पोट दुखणे, हागवण यासारखे त्रासही जंतांमुळे होतात.
----------------------------
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
जंतनाशक गोळ्यांचे वाटप शाळांमध्ये केले जाते. शिवाय जिल्हा हिवताप विभागाकडून यासाठी विशेष मोहीम राबविली जात असून त्यांतर्गत वर्षातून एकदा घरोघर सर्वेक्षण करून जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते.
------------------------
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सर्वेक्षण करून गोळ्यांचे वाटप केले जाते. त्यामुळे गोळ्याची गरज असल्यास जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात संपर्क साधता येतो.
---------------------------
जंतनाशक गोळी घ्या... (कोट)
जंत लहान मुलांनाच होते असे नसून मोठ्यांनाही होतात. यासाठी आरोग्य विभागाकडून घरोघर सर्वेक्षण करून जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून जंतनाशक गोळी घ्यावी.