देवरीत पायलट प्रोजेक्ट : आदिवासी नक्षलग्रस्त भागातून सुरूवात गोंदिया : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संपूर्ण संगणीकरणाच्या यशस्वीतेसाठी ‘प्रुफ आॅफ कॉन्सेप्ट’ करण्यात येणार आहे. राज्यात आधारबेस बायोमेट्रिक ओळख पटवून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांची आधार क्रमांक सिडीग असणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात देखील पीओसी मशीनद्वारे धान्य वितरणास शुभारंभ करण्यात आला. आदिवासी नक्षलग्रस्त भागातील देवरी तालुक्याची याकरीता विशेषत्वाने निवड करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथील लखनपाल पंधरे व देवरी शहरातील रामराज गौरीशंकर शाहू या दोन स्वस्त धान्य दुकानाची याकरिता निवड करण्यात आली आहे. दि. १६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार देवरी तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी टोनगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवाई, तालुका पुरवठा अधिकारी अगडे, पुरवठा निरीक्षक गायकवाड, जिल्हा कार्यालयाचे तांत्रीक अधिकारी अनीषा कोसरे, जिल्हा समन्वयक कमलेश मेश्राम व रास्त भाव दुकानदारांचे उपस्थितीत शिधापत्रिका धारकांना नवीन प्रणालीृबाबत माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात आधारक्रमांकाची ओळख पीओएस मशीनद्वारे करून शिधाप्ाित्रकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले. सदर प्रणालीच्या वापराने सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या प्रणालीत आनुग्रह परिवर्तन होणार आहे. माहे २०१६ अखेर जिल्ह्यातील १००३ रास्तभाव दुकानात पीओसी प्रणालीद्वारे धान्याचे वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाने दिलेले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभाग कार्यरत आहे. या कामी सर्व रास्तभाव दुकानदारांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या सधन कुटूंबानी सदर योजनेचा लाभ सोडावा जेणेकरून गरजु व गरीब आदीवासी कुटूंबाना लाभ देता येईल. अश्या गरजू कुटूंबाचे हितास्तव सधन शिधापत्रिकाधारकांनी आपला हक्क सोडावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात ‘पीओएस’द्वारे धान्य वितरणास सुरूवात
By admin | Published: January 18, 2017 1:23 AM