बोंडगावदेवी : शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळावे, त्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळावी. योग्य भाव मिळून हातामध्ये पैसा खेळता राहावा. बाजारात शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल हमखास ओळखून यावा, यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विकेल ते पिकेल या संकल्पनेतून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना छत्री व बॅनर विनामूल्य वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांनी पिकविलेला विषमुक्त भाजीपाला सहज उपलब्ध व्हावा अशी प्रत्येक सामान्य जनतेची अपेक्षा असते. भाजीपाला, फळे, धान्य थेट शेतकऱ्यांकडून विकत घेता यावे असे ग्राहकांना वाटते. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन उत्पादित केलेला माल खरेदी करणे ग्राहकांना शक्य होत नाही. गावातील आठवडी बाजार, गुजरीमध्येसुद्धा विक्री करणारे शेतकरी असतात; परंतु ग्राहकांना ते ओळखता येत नाही. बाजारातील भाजीपाला विकणारा शेतकरी सहज ओळखून यावा या हेतूने संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत कृषी विभाग, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांना एक छत्री व बॅनर वाटप करण्यात आले. त्यावर अभियानाचे लोगो, नाव, कृषी विभागाचे नाव रेखांकित असल्याने तो भाजीपाला विक्रेता ग्राहकांना हमखास ओळखता येतो. बाजारात छत्री व बॅनर दिसल्याने ग्राहक आकर्षिल्या जात आहे. कृषी विभागाच्या या नावीण्यपूर्ण उपक्रमाने भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली. शेतकऱ्यांचा शेतमाल जलदगतीने विक्री होतो. स्वत: पिकविलेला शेतमाल मनाजोगे भावाने विक्री करणे सहज शक्य होऊन हातामध्ये पैसा खेळता राहत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडायला वेळ लागत नाही. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे व इतर कर्मचारी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.