गोंदिया : जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी शनिवार (दि.१७) केटीएस सामान्य रुग्णालय व क्रीडा संकुल येथील कोविड सेंटरला भेट दिली. यात त्यांनी, कोविड-१९ रुग्णांच्या उपचारांच्या अनुषंगाने व रुग्णांना मिळत असलेल्या सोईसुविधांबाबत आढावा बैठक घेऊन त्याबाबत माहिती घेतली.
गुंडे यांनी, केटीएस सामान्य रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांट, वीआरडीएच प्रयोगशाळा, कोविड रुग्ण कक्ष तसेच सीटी स्कॅन मशीन या ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. नितीन कापसे, वीआरडीएल प्रयोगशाळेचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप गेडाम, बालरोग विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. मनीष तिवारी, ऑक्सिजन प्लांट नोडल अधिकारी डॉ. रितेश बोदडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, वैैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय माहुले, शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. विनायक रुखमोडे, शल्यचिकित्सक शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर जायस्वाल, औषधशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. सुजाता दुधगांवकर व इतर विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------
तयारीचा घेतला आढावा
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी गुंडे यांनी, डीसीएच कोविड रुग्ण कक्षामध्ये देण्यात येत असलेल्या सोईसुविधांबाबत, तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. तसेच कोविड पेडीएक्ट्रिक्ट बालरुग्णांच्या उपचारांच्या दृष्टीने तयार केलेल्या रुग्णकक्षाचीही पाहणी करून त्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच आवश्यक ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.