वीज चोरीची समस्या गंभीर : मागील वर्षाच्या तुलनेत गळतीत घट कपिल केकत गोंदिया महागड्या वीजेचा सर्वांनाच फटका बसत असताना खुद्द वीज वितरण कंपनी वीज गळतीच्या समस्येने त्रस्त आहे. जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात २२.७३ टक्के वीज गळतीची नोंद करण्यात आली आहे. वीज गळतीसाठी अनेक कारणे असली तरी वीज चोरी हे त्यातील सर्वाधिक महत्वाचे कारण आहे. या आकडेवारीवरून वीज चोरीला आळा घालण्यात महावितरणला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वीजेची गळती म्हणजे थेट वीज कंपनीच्या मानगुटीवर येणारा विषय आहे. वीजेच्या गळतीसाठी ट्रान्समिशन, मीटर नादुरूस्ती, उपकरणांतील नादुरूस्ती व वीज चोरी अशी कारणे असतात. यात वीज चोरी हे कारण मात्र सर्वात गंभीर असून यापासून महावितरण कंपनीला सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. ट्रांसमिशन व मीटर-उपकरण नादुरूस्तीच्या कारणांवर तोडगा काढून महावितरणने त्यामध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे त्या कारणांनी होत असलेली वीज गळती बऱ्याच प्रमाणात बंद झाली आहे. त्यामुळेच गेल्यावर्षीच्या तुलनेत गळतीचे प्रमाण काही अंशी कमी करण्यात यश आले आहे. परिणामी सन २०१५-१६ मध्ये २२.७३ टक्के वीज गळतीची नोंद करण्यात आली आहे. यात लघुदाब वीज गळती ज्यावरून औद्योगिक, घरगुती, कृषी व व्यवसायिक कनेक्शन दिले जातात त्याची वीज गळती २६.४७ टक्के आहे. २०१४-१५ मध्ये लघुदाब वीज गळती २८.१५ टक्के होती व यंदा ती कमी असल्याचे यातून दिसून येते. ‘थेफ्ट ड्राईव्ह’चे चांगले परिणाम वीज चोरीच्या प्रकारावर आळा घालून वीज चोरट्यांकडून तेवढी रक्कम वसुल करता यावी यासाठी वीज वितरण कंपनीकडून वीज चोरट्यांविरोधात मोहीम राबविली जाते. सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे सन २०१५-१६ मध्ये ८६ लाख रूपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. यात भल्याभल्यांना दणका बसला आहे. मात्र ही मोहीम सातत्याने राबवून अनेक मोठ्या वीज चोरांना पकडण्याची हिंमत सदर पथकाने दाखविल्यास वीज गळतीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात २३ टक्के वीज गळती
By admin | Published: August 20, 2016 12:49 AM