गोंदिया : नवतपा लागताच आतापर्यंत ४० डिग्रीच्या आत असलेला पारा आता चांगलाच वर चढू लागला आहे. बुधवारपासून बघितले असता, जिल्ह्यातील पारा ४२ डिग्रीच्या घरात पोहोचला आहे. येत्या २ जूनपर्यंत नवतपा असल्याने आणखी दोन दिवस जिल्हावासीयांना हा उकाडा सहन करावा लागणार असल्याचे दिसते.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाने हजेरी लावल्याने मे-हिटचा त्रास जाणवला नव्हता. तोपर्यंत पाराही ३८-३९ डिग्रीपर्यंतच पोहोचला होता. मात्र मंगळवारपासून (दि.२५) नवतपा लागला व बघता-बघता पारा ४० डिग्रीच्या पार गेला असून, आता दररोज ४२ डिग्रीवर जाऊन थांबला आहे. आठवडाभरापासूनच ही स्थिती असून, यामुळे नवतपा आता आपल्या रंगात आल्याचे दिसत आहे. उन्हाळ्यातील सर्वाधिक उकाड्याचे हे ९ दिवस असल्याचे बोलले जात असून, त्याची प्रचिती आता दिसून येत आहे. सोमवारीही जिल्ह्यातील तापमान बघितले असता, ४२.२ डिग्रीएवढे नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने यंदा नवतपातही ढगाळ वातावरण व पाऊस सांगत तापमान सामान्य राहणार, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तसे काही झाले नसून, उलट नवतपा लागताच पारा वेगाने चढला व आता थेट ४२ डिग्रीवर जाऊनच थांबल्याचे दिसत आहे. मात्र अचानकच झालेल्या या तापमान वाढीमुळे जिल्हावासीयांचा जीव कासावीस झाला आहे. अशात कधी पाऊस पडतो व या उकाड्यापासून एकदाची सुटका मिळते, अशीच सर्वांची इच्छा आहे.
------------------------------
एसी व कुलरही झाले फेल
आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ३८-३९ डिग्रीपर्यंतच गेले होते. त्यातही ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत नव्हता. मात्र आता अचानक तापमान ४२.२ पर्यंत गेल्याने जिल्हावासीयांना हा उकाडा असह्य होत आहे. विशेष म्हणजे, आता एसी व कुलरही फेल ठरत असल्याचे नागरिक बोलत आहेत. यावर आता एकच उपाय असून, पावसाने हजेरी लावली तरच यापासून सुटका होणार आहे.