गोंदिया : सामान्य वातावरणात यंदाचा नवतपा निघणार असा हवामान खात्याचा अंदाज असताना मात्र मागील दोन दिवसांपासून सूर्यदेव आग ओकू लागले आहे. परिणामी आतापर्यंत ४० डिग्रीच्या आत असलेले तापमान आता ४१ डिग्री पार होत आहे. यामुळे आता नवतपा आपल्या रंगात आल्याचे दिसत असून आग ओकणारे आणखी ४ दिवस उरलेच आहेत. यात तापमान आणखी किती चढते, हा विचार करूनच जिल्हावासीयांना धडकी भरू लागली आहे.
यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अर्धा महिना थंडगार निघून गेला. परिणामी जिल्हावासीयांना मे-हीटचा तेवढा सामना करावा लागला नाही. मात्र मंगळवारपासून (दि. २५) नवतपा सुरू झाला असून त्यानंतर आता जिल्ह्याचा पारा चढतच चालला आहे. आतापर्यंत ४० डिग्रीच्या आत असलेला पारा नवतपामध्ये ४१ व ४२ डिग्रीच्या घरात गेला आहे. यावरूच नवतपा आता आपल्या रंगात आल्याचे दिसत आहे. येत्या २ जूनपर्यंत नवतपा राहणार असल्याने आणखी ४ दिवस या उन्हाचे चटके सहन करावे लागणार असून हा विचार करूनच धडकी भरत आहे.
---------------------------
लॉकडाऊनमुळे अनेकांना दिलासा
एरवी कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत असल्याने सर्वांनाच उन्हाचा सामना करावा लागत होता. आता मात्र लॉकडाऊन लागले असून सकाळी ११ वाजतानंतर घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. परिणामी सकाळी कामे आटोपून बहुतांश नागरिक आपल्या घरीच आहेत. दुकान बंद असल्याने व्यापारी आपल्या परिवारासोबत वेळ घालवित आहेत. मात्र नोकरदारवर्गाला नाइलाजास्तव उन्हाचे चटके सहन करीत कामावर जावेच लागत आहे.