गोंदिया : मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ सातत्याने डाऊन होत आहे. परिणामी कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ वर आली आहे. आठ तालुक्यांपैकी तीन ते चार तालुक्यात केवळ १ ते दोनच रुग्ण ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
मंगळवारी (दि. २९) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १६३५ नमुने तपासणी करण्यात आले. यात ५२ स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर तर १५८३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात २ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१२ टक्क आहे. मंगळवारी पाच बाधितांनी कोरोनावर मात केली तर दोन नवीन रुग्णांची नोंद झाली. एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,९४,५२० स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात १,६८,९७८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २,१६,७२२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,९५,७६७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१२२ कोरोना बाधित आढळले असून ४०,३८१ जणांनी मात केली आहे. सद्यस्थितीत ४१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २०८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...................
कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.१८ टक्के
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रिकव्हरी रेट सातत्याने वाढ आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९८.१८ टक्के असून तो राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा अधिक आहे. ही बाब जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.
...................