गोंदिया : कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खालावत असून मात करणाऱ्यांचा ग्राफ उंचावत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ ६७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
रविवारी (दि.२०) जिल्ह्यातील १९ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ११ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर मागील सात दिवसांपासून जिल्ह्यात एका कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून चार तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष करणे पुन्हा कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १८७२५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १६१९७२ नमुने निगेटिव्ह आले. काेरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत २०२१९४ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १८१२५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१०८४ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०३१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २५० नमुन्यांचा अहवाल प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
....................
३०९६ नमुन्यांची चाचणी ११ पॉझिटिव्ह
काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी ३०९६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८२८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २२६८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ११ नमुने पॉझिटिव्ह आढळले त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३६ टक्के आहे.
..............
साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३५०६५२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात २६७९४६ नागरिकांना लसीचा पहिला डोस तर ८२७०६ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.