गोंदिया : मान्सून सुरू झाला असूनही जिल्ह्यात आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस झाल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात आताही कभी धूप ते कभी छाव अशीच स्थिती आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १९२.८ मीमी पाऊस बरसणे अपेक्षित होते. मात्र वास्तविक ७२.१ मीमी पाऊसच आतापर्यंत बरसला आहे. अशात शेतकऱ्यांना नियमित पावसाची प्रतीक्षा आहे.
७ जूनपासून मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. आता पाऊस बरसणार व उकाड्यापासून सुटका मिळणार अशी सर्वांनाच अपेक्षा असते. शिवाय पाऊस बसरल्यावर खरिपाच्या कामाला लागून सोने पिकविण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत असतो. मात्र आता १४ तारीख लोटली मात्र पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. आजही कधी पाऊस बरसत आहे, तर कधी ऊन तापत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत जेथे १९२.८ मीमी. पाऊस बरसणे अपेक्षित होते तेथे फक्त ७२.१ मीमी पाऊस बरसला आहे. म्हणजेच, अपेक्षित पावसाच्या फक्त ३७.४ टक्केच पाऊस बरसल्याचे दिसत आहे.
आता खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतीची कामे सुरू होत आहेत. अशात शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र आजही नियमित पाऊस बरसत नसल्याने शेतकरी शेतात उतरण्यासाठी मागे पुढे बघत आहे. एकदा नियमित पाऊस सुरू झाल्यास शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या नजराही आकाशाकडे लागल्या आहेत. मात्र पाऊस दडी मारून बसल्याने उकाडा वाढत आहे. सर्वसामान्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे.
----------------------------------------
सर्वाधिक पाऊस गोंदिया तालुक्यात
जिल्ह्यात आतापर्यंत ७२.१ मीमी पाऊस बरसला असून, यामध्ये सर्वाधिक ९८.२ मीमी पाऊस गोंदिया तालुक्यात बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर अर्जुनी-मोरगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथे ८९.१ मीमी पाऊस तर तिसऱ्या क्रमांकावर तसेच तिरोडा तालुका असून, तेथे ६९.२ मीमी. पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------------------
तालुकानिहाय बरसलेला पाऊस
तालुका पाऊस (मीमी)
गोंदिया ९८.२
आमगाव ६४.३
तिरोडा ६९.२
गोरेगाव ६२.३
सालेकसा ४८.६
देवरी ५५.६
अर्जुनी-मोरगाव ८९.१
सडक-अर्जुनी ६३.३
एकूण ७२.१