गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख दररोज उंचावत आहे. मृताचे मीटर सुध्दा सुरुच आहे. कोरोनाबाधित आणि मृतांचे दररोज वाढणारे आकडे आता धोक्याची घंटा देऊ लागले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती सुध्दा बिकट होत चालली आहे. अशात जिल्हावासीयांनी वेळीच दक्ष होत स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात शनिवारी (दि.१७) ५७१ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ८८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. २२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी आढळलेल्या ८८५ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४८४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १३०, गोरेगाव ११९, आमगाव १२, सालेकसा १३, देवरी १६, सडक अर्जुनी १६, अर्जुनी ९१ आणि बाहेरील राज्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १२१७३७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०२६१३ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ११३९१ नमुने तपासणी करण्यात आले त्यापैकी १००९१७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४८८१ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १८०६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत ६४८९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. २०३२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
आठ दिवसात ८३८५ बाधितांची नोंद
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तेव्हा सर्वाधिक ३८५ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. मात्र यंदा कोरोनाने सर्व रेकार्ड मोडले असून शनिवारी सर्वाधिक ८८५ बाधितांची नोंद झाली. मागील आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ८३८५ बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस स्फाेटक होत चालली आहे.
.......
सात दिवसात ११७ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. अशातच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. मागील सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ११७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
.......
रुग्ण वाढीचा दर २३ दिवसांवर
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा आता २५ हजाराच्या जवळपास पोहचला आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने रुग्ण वाढीचा दर सुध्दा आता २३ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ७२.८८ टक्के आहे.