गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे. गोंदिया आणि तिरोडा तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण नसल्याच्या बरोबरीत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हावासीयांनी थोडी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून आपण कोरोनाला जिल्ह्यातून निश्चितच हद्दपार करू शकतो. त्यामुळे आणखी काही दिवस थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
सोमवारी (दि. १५) जिल्ह्यात पाच नवीन बाधितांची नोंद झाली, तर आठ कोरोनाबाधितांनी मात केली आहे. सोमवारी आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ४ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६७,९३३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५६,२६८ नमुने निगेटिव्ह आले आहे, तर कोरोनाबाधित रुग्णाचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ६७,०३४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०,८८५ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२९७ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,०४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत केवळ ७१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
......
चार झाले, दोन मुक्त होण्याच्या मार्गावर
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. गोरेगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, देवरी हे चार तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत, तर अर्जुनी मोरगाव आणि आमगाव तालुक्यात केवळ दोनच कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे हे दोन तालुुकेसुद्धा लवकर कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.