गोंदिया : कोरोनाचा संसर्ग कायम असताना गोरगरिबांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सन २०२१-२२ या वर्षात ८ जून २०२१ पर्यंत २ लाख १३ हजार ९८६ मजुरांच्या हाताला काम दिले आहे. कोरोनामुळे विस्कटलेल्या आर्थिक घडीला सुरळीत करण्यासाठी ग्रामीण भागात रोहयोच्या कामाचा आधार घेतला जात आहे. यंदा केलेल्या कामामुळे आतापर्यंत २४ कोटी रुपयांची मजुरी मजुरांनी कमविली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळावे यासाठी जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार ९३३ कुटुंबांनी जॉब कार्ड बनविले. यापैकी दोन लाख १३ हजार ९८६ मजुरांनी रोहयोच्या कामावर काम केले. जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायत अंतर्गत सेल्फवरील ७ हजार १९८ कामे करण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत ३ हजार ३७६ कामे सुरू आहेत. या कामांवर आजघडीला १ लाख १ हजार ४२६ मजूर कामावर आहेत. आतापर्यंत रोहयोअंतर्गत करण्यात आलेल्या कामावर राेहयोच्या मजुरांनी २३ कोटी ८७ लाख रुपये मजुरी कमविली आहे, तर २ कोटी ९१ लाख रुपये रोहयोच्या साहित्यावर खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९ लाख ५७ हजार ३०४ मनुष्यदिवस काम करण्यात आले असून, वेळेवर मजूर प्रदान करण्याची टक्केवारी ९९.११ आहे.
............
कोट
गोंदिया जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये सद्य:स्थितीत काम सुरू आहे. नागरिकांना काम देऊन जिल्ह्याचा विकास करण्याचा आमचा मानस आहे. सद्य:स्थितीत लाखोंच्यावर मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत.
- सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गोंदिया.