गोंदिया : कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. सर्वत्र एकाच वेळी ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. गोंदिया जिल्ह्यातही ऑक़्सिजनची समस्या निर्माण झाली होती. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा करुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले. त्यामुळेच आठ दिवसांच्या कालावधीत ४० टन लिक्विड ऑक्सिजन गोंदिया जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे.
लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीने सोमवारी (दि.२६) पुन्हा १० टन लिक्विड ऑक्सिजनचा जिल्ह्याला पुरवठा केला. सोमवारी टँकर क्रमांक एमएच ४०, एन ४९५८ हा गोंदिया येथे दाखल झाला. खा. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या चर्चेनंतर आयनॉक्स कंपनीने आतापर्यंत प्रत्येकी १० टन क्षमतेचे चार टँकर गोंदिया जिल्ह्याला पाठविलेले आहे. त्यामुळे ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर बऱ्याच प्रमाणात मात झाली आहे. सद्य स्थितीत गोंदिया जिल्ह्याला ऑक्सिजन टंचाई नसल्याची माहिती आहे. खा. पटेल यांच्या पुढाकाराने ऑक्सिजन अभावी होणारी रुग्णांची गैरसोय टाळण्यास मोठी मदत झाली आहे.