गोंदिया: संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन गोंदिया जिल्हा क्षयरोगमुक्त व्हावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे यांनी जिल्हावासियांना कळविले आहे. २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळण्यात येतो.
रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरीअम टयुबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळण्यात येतो. या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९६२ पासून प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये राबविला जात आहे. अनेक रोगाचे समूळ उच्चाटन करण्यात यश आले आहे. परंतु क्षयरोगावर अद्यापही पुर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. ही चिंताजनक बाब आहे, मागील वर्षी मार्चपासून आलेल्या कोरोना महामारीमुळे क्षयरोग कार्यक्रमावर बराच परिणाम झाला आहे. कोरोनाचे लक्षणे व क्षयरोगाच्या लक्षणामध्ये बरेच साम्य असल्यामुळे नागरिक लक्षण असताना सुध्दा क्षयरोगाची तपासणी करण्यास घाबरु लागले आहेत. पण असे करुन आपण आपला आणि इतरांचा जिव धोक्यात टाकत आहोत. एक क्षयरुग्ण उपचाराविणा राहीला तर तो वर्षभरामध्ये त्याच्यासारखे पंधरा रुग्ण तयार करीत असतो. दोन आठवडे किवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, संध्याकाळी हलका ताप, वजनात घट होते, भूक मंदावने, छातीत दुखणे,थुंकीतुन रक्त पडणे ही लक्षणे दिसून आल्यास क्षयरोगाचा संशयीत रुग्ण समजावा. २०२५ पर्यंत आपल्याला भारतातून क्षयरोग नष्ट करावयाचा असून प्रत्येक नागरिकांनी क्षयरोगाविषयीची माहिती घेवून त्याची जनजागृती करावी. यावेळी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर उपस्थित होते.
बॉक्स
अशी होणार जनजागृती
जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यामध्ये मुखवटा सेल्फी अभियान (मास्क सेल्फी कॅम्पेन) त्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य लोक, ट्राफिक पोलीस,ऑटोचालक, बसचालक व इतर भागधारकामध्ये मास्क वितरीत करण्यात येईल. त्याचबरोबर पथनाटय कार्यक्रम, माईकींग कार्यक्रम, बॅनर, स्टिकर, पॉम्प्लेटस आदी उपक्रम आठवडाभर राबविण्यात येतील.