लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेल्या जिल्ह्यांचा पहिल्या स्तरात समावेश करीत सोमवारपासून अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करीत जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि. ७) जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीत होणार असल्याने व्यावसायिक आणि जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे उद्योग धंदे, छोटे मोठे व्यवसाय, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला तर व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. मात्र जिल्ह्यात आता कोरोना संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्हिटी रेट सुध्दा २ टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करीत जिल्हात अनलॉक करण्यात येत असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रविवारी सायंकाळी काढले. त्यामुळे सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्णपणे सुरळीत होणार आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
काय झाले सुरू - अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने, आस्थपाना - इतर वस्तूंची सर्वच दुकाने, किरकोळ वस्तू विक्री दुकानांचा समावेश- सार्वजनिक मैदाने, उद्याने, प्रार्थना स्थळे, मंदिरे, मार्निंग वॉक, सायकलिंग- सर्वच प्रकारचे खेळ, मैदानी खेळ, प्रशिक्षण- सर्व खासगी व शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू- सभा, निवडणुका घेण्यास परवानगी- सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था, आंतरजिल्हा प्रवासास परवानगी, मालवाहतुकीस परवानगी- जिम, सलून, ब्युटी पार्लर सुरु होणार असून यासाठी ग्राहकांना पूर्वीच अपाॅईंटमेंट घेऊन जावे लागणार आहे.
जिल्हा अनलॅाक झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन
अंत्यविधीस २० जणांना परवानगी - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी जिल्ह्यात अंत्यविधीसाठी २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासाला मुभा- कोरोनाचा संसर्ग विचारात घेता मागील दोन महिन्यापासून आतंरजिल्हा प्रवासासाठी ई-पास अनिवार्य करण्यात आले होते. मात्र आता अनलॉक अंतर्गत हे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहे. सर्व प्रकारची वाहतूक आणि आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे करावे लागणार पालन - कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने अनलॉक करण्यात आला आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला ५० टक्के उपस्थिती - सर्वच प्रकारच्या सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी केवळ ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. माल्स, सिमेनागृह, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेसह सुरू- माल्स, सिनेमागृह, नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेसह साेमवारपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यांना सुध्दा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागले. तसेच नियमांचे उल्लघंन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. रेस्टाॅरेंट ५० टक्के बैठक क्षमतेने सुरू- सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येत असून ५० टक्के बैठक क्षमतेने रेस्टाॅरेंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विवाहसोहळ्यास १०० जणांना उपस्थित राहण्यास परवानगी- अनलॉक अंतर्गत विवाह सोहळ्यांना १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक लोक उपस्थित असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.