गोंदिया : कोरोना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आटोक्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ७ जूनपासून अनलॉक करण्यात आले. संचारबंदी, जमावबंदीचा आदेशही काढण्यात आला; परंतु निघालेल्या संचारबंदीच्या आदेशात आठवडी बाजार सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना नसल्याने जिल्ह्यातील आठवडी बाजार अद्यापही बंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही आदेश प्राप्त न झाल्याने बाजार सुरू करावा की नाही? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रशासनाने १५ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबदी लागू केली होती. संचारबंदीच्या काळात आठवडी बाजार बंद करण्याचेही नमूद करण्यात आले होते. संसर्गाचा वेग मंदावल्याने ७ जूनपासून जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी उठविण्यात आली. जमावबंदीचा आदेशही हटविण्यात आल्याने आठवडी बाजार सुरू होणे अपेक्षित होते. आठवडी बाजाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला महसूल प्राप्त होतो; परंतु निघालेल्या संचारबंदीच्या आदेशात जरी जमावबंदी हटविण्याचा आदेश असला तरी, त्या आदेशात आठवडी बाजार सुरू करण्याचा उल्लेख नसल्याने अनेक ग्रामपंचायत परिसरात आठवडी बाजार सुरू झाले नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.