गोंदिया : कोरोनाला मूठमाती देणाऱ्या भारतातील दोन लसींचे शनिवारपासून (दि.१६) अवघ्या देशपातळीवर लसीकरण सुरू झाले आहे. लसींचा हाच पायगुण जिल्ह्याला लागल्याचे दिसून आले. मागील सुमारे ६-७ महिन्यांनंतर शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात फक्त ७ बाधितांची नोंद घेण्यात आली असून २९ तब्बल चौपटीने रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
अवघ्या जगाला जे जमले नाही ते भारताने करून दाखविले. कोरोनाला मात देणाऱ्या दोन लसी विकसित करून अवघ्या जगाला आपल्या समोर नमविले आहे. या दोन्ही लसींना भारतात परवानगी मिळाल्यानंतर शनिवारपासून (दि.१६) देशपातळीवर या लसींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरणाला सुरुवात झाली असून शनिवारी जिल्ह्यात फक्त सात कोरोनाबाधित रूग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे या लसींचे पायगुणच जिल्ह्याला लाभले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-----------------------
कोरोनाच्या परतीचा प्रवास
कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्याने सुमारे २-३ महिने कोरोनाला वेशीवरच अडवून ठेवले होते. मात्र त्यानंतर जो बाधितांची भर पडण्यास सुरूवात झाली ती आतापर्यंत सुरूच आहे. त्यात दिवाळीनंतर रूग्ण वाढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सुदैवाने तसे काही झाले नाही उलट बाधितांची संख्या घटत गेल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र शनिवारचा दिवस जिल्ह्यासाठी पुन्हा भाग्याचा ठरला असून फक्त सात रूग्ण निघाल्याने आता खऱ्या अर्थाने कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे.
------------------------------
२९ रुग्णांनी केली कोरोनावर मात
जिल्ह्यात शनिवारी २९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यात गोंदिया तालुक्यातील १८, तिरोडा १, गोरेगाव ५, आमगाव १, देवरी २, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ रूग्ण आहे. तर मिळून आलेल्या ७ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ४ व आमगाव तालुक्यातील ३ रुग्ण आहेत.
---------------------------
जिल्ह्यात २०८ क्रियाशील रुग्ण
जिल्ह्यात आता २०८ क्रियाशील रुग्ण उरले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १२७, तिरोडा १८, गोरेगाव ७, आमगाव २४, सालेकसा ९, देवरी १२, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.