गोंदिया : दिवसेंदिवस होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळे वनांचे अस्तित्त्वच धोक्यात आले आहे. वृक्ष लावा, त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. वृक्ष लावले जातात. मात्र त्यांच्या संरक्षणाकडे व संवर्धनाकडे त्यानंतर लक्षच दिले जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लावलेले रोपटे वृक्षात रूपांतरित होण्याआधीच नष्ट होऊन जाते. परंतू सामाजिक वनीकरण विभागाने केवळ रोपट्यांची लागवड न करता त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात ९४ हजार खड्ड्यांचे उद्दिष्ट वृक्ष लागवडीसाठी देण्यात आले आहे. यापैकी ८४ हजार ६०० खड्डे आता तयार झाले आहेत. म्हणजे यंदा जिल्ह्यात एकूण ८४ हजार ६०० वृक्षांची लागवड करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहे. आमगाव, सालेकसा, गोंदिया व गोरेगाव तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कार्य प्रगतीपथावर असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी युवराज कुंभलकर यांनी सांगितले. गोंदिया व गोरेगाव तालुके मिळून एकूण चार हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. मात्र केवळ दोन हजार ६०० रोपांचीच लागवड होणार असल्याची माहिती कुंभलकर यांनी दिली. गोंदिया तालुक्यात पाच किमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. दोन किमीपर्यंतच्या एका रस्त्यावर दोन हजार वृक्ष लागवड असे लागवडीचे प्रमाण आहे. गोरेगाव तालुक्यासाठी दोन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. मात्र सध्या तिथे ६०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. आमगाव व सालेकसा तालुक्यांत एकूण आठ रस्त्यांवर वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. त्यावर एकूण १६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शिवाय या दोन्ही तालुक्यात विखुरलेल्या स्वरूपात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यात विविध शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. आमगाव येथील बस स्थानकावर २०० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. आमगावातील क्रीडा संकुलात २०० व आयटीआयमध्ये २०० अशा एकूण ४०० वृक्षांची लागवड लवकरच करण्यात येणार असल्याचे कुंभलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी )
जिल्ह्यात ८४,६०० रोपट्यांची होणार लागवड
By admin | Published: July 23, 2014 12:04 AM