गोंदिया : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानाची वरखाल सुरू असून कधी थंडी तर कधी उकाडा जाणवू लागला आहे. अशात गुरुवारी (दि. २१) जिल्ह्याचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. मात्र शुक्रवारी (दि. २२) जिल्ह्याचे तापमान पुन्हा पडले असून ९.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी विदर्भात जिल्ह्याचे तापमान सर्वात कमी असल्याचे दिसले.
वातावरणातील सततच्या बदलामुळे यंदा हिवाळा कसा आला व कसा जात आहे, हे काही कळेनासे झाले आहे. पूर्वी अंगाला थरकाप आणणारी थंडी आता पडत नसून यंदा तर बोटावर मोजण्याएवढेच दिवस सोडल्यास थंडी जाणवलीच नाही, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मध्यंतरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते व त्यामुळेही थंडी ओसरली होती. तेव्हा उघाड आल्यावर थंडीचा जोर वाढणार असे वाटत होते. मात्र आता उघाड आल्यावर दिवसा उन्हाचे चटके जाणवत असून रात्रीला थोडीफार थंडी जाणवत आहे. सातत्याने बदलत चाललेल्या वातावरणाचे हे परिणाम असून गुरुवारी (दि. २१) किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंद घेण्यात आली असतानाच शुक्रवारी (दि. २२) मात्र ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शुक्रवारी विदर्भात गोंदिया जिल्ह्याचे तापमान सर्वात कमी दिसून आले. तर सोबतच वातावरणात थोडीफार थंडीही जाणवली. यामुळे कधी हिवाळा अजूनही संपलेला नाही असे वाटते. मात्र दुपारी उकाडा वाटत असून अंगाला घाम फुटत असल्याने आताच उन्हाळा सुरू झाला काय असे काहीसे वाटू लागत आहे.