गोंदिया : कोरोनाने अवघ्या जगाला हेलावून सोडले असून यामुळे सर्वच देशांची अर्थव्यवस्था विस्कटली आहे. आपला देशही यापासून सुटलेला नसून मागील वर्षभरापासून देशात महागाई कळस गाठत आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ महागाईला कारणीभूत ठरत असून सर्वच वस्तूंचे दर वधारलेले आहेत. विशेष म्हणजे, एकदा चैनीच्या वस्तूंना पुढे ढकलता येते. मात्र जीवनावश्यक व दररोजच्या वापरातील वस्तूंपासून लांब राहता येत नाही. अशात आता भाजीपाला महागला असल्याने जेवणावर परिणाम होत आहे. त्यात भर म्हणजे, तेलाचे दर वधारले खाद्य तेलांचे दर वधारल्याने जेवणातील फोडणी तसेच पाम तेलाचे दर वधारल्याने आता देवापुढचा दिवाही महागला आहे.
----------------------------------
तेलाचे दर (प्रती किलो)
तेल जुलै २०२० जुलै २०२१
सोयाबीन १५० १६०
पाम १३० १४०
सूर्यफूल १५० १७०
करडी १५० १६०
-------------------------
दरवाढीचे कारण काय?
- सध्या देशात नेपाळ येथून तेलाची आयात होत आहे. यामुळेही तेलाचे दर वधारल्याचे दिसून येत आहे.
- व्यापाऱ्यांना कमी दरात तेल विकून तोटा पत्करायचा नाही यामुळेही ते दर वाढीव दरातच तेलाची विक्री करतात.
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्यामुळे ट्रान्सपोर्टिंगचा खर्च वाढला असून हा सर्व हिशेब करून ते दर वाढवून विक्री करतात.
--------------------------------
पोटपुजेसोबतच देवपूजाही महागली
महागाईने सर्वसामान्यांना जगणे कठीण करून सोडले आहे. भाजीपाला वधारल्याने ताटातून भाज्या गायब झाल्या आहेत. त्यात आता तेलाची दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे, पाम तेलाचे दर वधारल्यामुळे आता देवा पुढे दिवा लावतानाही प्रश्नच पडत आहे.
- प्रिया सावंत (गृहिणी)
-----------------------------
मागील वर्षभरापासून प्रत्येकच वस्तूंचे दर सातत्याने वाढत चालले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई आता कळस गाठत आहे. मात्र तेलाचे भाव वधारल्याने जेवणाचा प्रश्न पडला असून पाम तेलाचे दर वधारल्यामुळे देवापुढचा दिवाही महागला आहे.
- सुजाता बहेकार (गृहिणी)