लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मासिक पाळीबाबत समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. त्या दूर व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘पॅडमॅन’ चित्रपटातून चांगलेच प्रबोधन होणार असून मुलींनी आता कोणतीही लाज न बाळगता बोलते व्हावे, अशी संदेशवजा प्रतिक्रिया ‘पॅडमॅन’ चित्रपट बघायला आलेल्या विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.तिरोडा येथील स्रेहल सिनेमा या चित्रपटगृहात शनिवारी (दि.३१) सकाळी ९ वाजता मुलींसाठी ‘पॅडमॅन’ चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हा परिषद हायस्कूल करटी, गांगला, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सतोना, विहीरगाव, मलपुरी, सेजगाव, सोनेगाव, सरांडी येथील सुमारे २५० विद्यार्थिनींना चित्रपट दाखविण्यात आला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त (ओडीएफ) झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हागणदारीमुक्त प्लस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात शौचमुक्त गावासह मासिक पाळी व्यवस्थापनाचा समावेश करण्यात आला आहे. त्या दृष्टीने महिला व शाळकरी विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्याचे शासनाचे धोरण आहे.दरम्यान तिरोडा येथील चित्रपट गृहाला जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी भेट देवून विद्यार्थिनींशी संवाद साधला. चित्रपट बघितल्यानंतर केवळ मनोरंजन म्हणून त्याकडे पाहू नका. चित्रपटातील संदेश आपल्याच वयाच्या इतरही मुलींपर्यंत पोहोचवा. आपले गाव स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक विद्यार्थिनीने स्वत: शौचालयाचा वापर करून आपल्या पालकांना शौचालय वापरण्याचा आग्रह धरण्याचे आवाहनही याप्रसंगी राठोड यांनी केले. खुशी असाटी, वैष्णवी पटले अशा अनेक विद्यार्थिनींनी आपल्या गावात स्वच्छतेचा प्रसार करण्याचे मत व्यक्त करून शासनाच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले.विद्यार्थिनींच्या व्यवस्थेसाठी पंचायत समिती तिरोड्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पी.पी. समरीत, शिक्षण विस्तार अधिकारी एम.डी. पारधी, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जि.प. गोंदियाचे माहिती, शिक्षण व संवादतज्ज्ञ अतुल गजभिये, सर्व शिक्षा अभियानाचे विषय साधन व्यक्ती ब्रजेश मिश्रा, सुनील ठाकरे, प्रतिभा लांडगे, शालिनी कुंजरकर, नरेंद्र बारेवार यांच्यासह संबंधित शाळांचे शिक्षकही या वेळी उपस्थित होते.शिक्षण विभागाने दिले होते निर्देशशनिवारपर्यंत जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, आमगाव व तिरोडा तालुक्यातील एकूण एक हजार पाच विद्यार्थिनींना पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात आला. यानंतर रविवारी (दि.१) सकाळी ९ वाजता तिरोडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा घाटकुरोडा, मनोरा, चिरेखनी, जि.प. हायस्कूल तिरोडा, सुकडी-डाकराम तसेच सोमवारी (दि.२) जि.प. हायस्कूल परसवाडा, वडेगाव, उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार, भजेपार येथील एकूण ५५८ विद्यार्थिनींना चित्रपट दाखविण्यात आले आहे. संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह सकाळी ९ वाजतापूर्वी चित्रपटगृहात उपस्थित राहण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते.