गोंदिया : कोरोनाचा संसर्ग खूप वाढत असताना कोरोनाशी लढताना आता लस ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते; परंतु या लसीला शरीरानेही प्रतिसाद द्यावा यासाठी लस घेण्यापूर्वी व लस घेतल्यानंतर मद्यपान करू नये, अशा सूचना आरोग्य विभागाकडून लस घेणाऱ्यांना दिल्या जातात. लस घेतल्यानंतर तब्बल तीन आठवडे मद्यपान करू नये, असे सांगितले जाते.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना कोरोनाची लस घेणे अत्यावश्यक आहे; परंतु कोरोनाची लस घेताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना लस घेण्याच्या एक आठवडा आधीपासून व्यक्तीने व्यसन करू नये. मद्यपान केल्यानंतरही त्याच्या शरीरात असलेला अल्कोहल तब्बल चार-पाच दिवस राहते. यामुळे मद्यपान केल्याच्या आठवडाभरानंतरच लस घ्यावी. लस घेतल्यानंतर तब्बल तीन आठवडे मद्यपान करू नये, असा सल्ला देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात मद्यपींची संख्या आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने सर्वच प्रकारच्या व्यापारावर गंभीर परिणाम पडला; परंतु दारूविक्रीच्या व्यवसायावर कोरोनाचा कसलाही प्रभाव पडलेला दिसत नाही. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असतानाही गोंदिया जिल्ह्यातील मद्यप्रेमींनी कोट्यवधींची दारू पोटात रिचवली आहे.
.........
देशी दारू --७,८०,००० लिटर
विदेशी दारू--१ लाख ३५ हजार लिटर
बीअर--७० हजार लिटर
..........
बॉक्स
इतर व्यवसाय ठप्प; पण दारूचा व्यवसाय जोमात
कोरोनाच्या काळात लोकांकडे पैसे नाहीत, अशी ओरड सुरू होती. किराणा, औषध अशा जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वच व्यापार ठप्प पडलेत; पण दारूच्या व्यवसायावर फरक पडला नाही. यासंदरर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल २०२० या महिन्याचा लॉकडाऊन कालावधी सोडून मे २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात ७७ लाख ४७ हजार ७९५ लिटर देशी दारू, १३ लाख ४३ हजार ७२५ लिटर विदेशी दारू, ६ लाख ९४ हजार ८१७ लिटर बीअर, तर १० हजार ६५ लिटर वाइन, अशी एकूण ९७ लाख ९६ हजार ४०२ लिटर दारूची विक्री केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली.
.....
कोट
कोरोनापासून बचावासाठी मद्यपींनी लस घेण्याच्या एक आठवडाभरापूर्वी व लस घेतल्यानंतर तीन आठवडे मद्यपान करू नये. ते त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
-डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, गोंदिया
.......
कोट
शक्यतो कधीच मद्यपान करू नये; परंतु व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांनी लसीकरणापूर्वी व लसीकरणाच्या नंतरही मद्यपान टाळावे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाच्या काळात मौखिक स्वच्छताही ठेवावी. कसलेही व्यसन करू नये.
-डॉ. अनिल आटे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, गोंदिया.
.......
कोट
अँटिबॉडीजच्या उत्पादनाशी अल्कोहोलचा थेट संबंध नाही. लसीकरणानंतर अँटिबॉडीज तयार होण्यास सुमारे ३ आठवडे लागतील. म्हणूनच, लसीकरण आणि अल्कोहोलमधील कनेक्शन अद्याप स्पष्ट झाले नाही. अल्कोहोल लसीकरणाच्या प्रभावितेशी जोडले जाऊ शकत नाही. दारू कमी केल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होणार नाही, याची खात्री होईल. मद्यपान केल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कारण ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. हे तुम्हाला डिहायड्रेट करते आणि यकृताला कठीण समय देते. हे जाणून घेतल्यास तुम्हाला धक्का बसेल की, याचा परिणाम केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यावर होतो असे नाही, तर तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
-डॉ. प्रमेश गायधने, हृदयरोगतज्ज्ञ, गोंदिया