आमगाव : मागील वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली. रोजगार, व्यवसाय बंद पडले, आर्थिक परिस्थिती बदलली. या परिस्थितीत शासन दखल न घेता, ग्राहकांना वीजबिलावरून वेठीस धरले आहे. हा प्रकार त्वरित न थांबविल्यास मनसे स्टाइल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
आमगाव मनसे शाखेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अधिकारी देवरी यांना वीजबिल व नवीन वीजजोडणी आणि वीजपुरवठा खंडित करून नये याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात, राज्यात लॉकडाऊन असताना नागरिकांना अवाढव्य वीज आकारणी करून वीजबिले देण्यात आली. यात मूळ बिलात व्याजदर लावून सक्ती केली जात असून ती त्वरित थांबविण्यात यावी, बिलाची दुरुस्ती करून त्याचे सुलभ हप्ते पाडून देण्यात यावे, लॉकडाऊन वेळेतील वीजबिल माफ करावे, वाढीव दर रद्द करावा, विद्युतजोडणी त्वरित द्यावी, शेतावरील वीज कापण्यात येऊ नये, जीर्ण खांब बदलून मिळावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवळी, बाळू वंजारी उपस्थित होते. निवेदनाची प्रशासनाने दखल घ्यावी, जनतेला न्याय न मिळाल्यास मनसे स्टाइल आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.