लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने अपघाताच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून झालेल्या अपघात होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. म्हणून अपघाताचे प्रमाण कमी होणे करीता वाहतुकीच्या नियमांबाबत अल्पवयीन मुले व पालकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.आपल्या पाल्याच्या सुविधेसाठी त्यांना शाळा, कॉलेज व ट्युशन क्लासेसला जाण्याकरीता पालक वाहन खरेदी करुन देतात. परंतु अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा परवाना दिला जात नसून कायद्यानुसार विना परवाना वाहन चालविणे गुन्हा आहे. तसेच वाहनांवर ट्रिपल सिट बसवून कायद्याचे उल्लंघन करुन वाहन वेगाने चालवितात. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होवून स्वत:चा व दुसऱ्यांचा जीव धोक्यात आणत असतात.वाहन मालकाने विना परवाना धारकास वाहन चालविण्यास देणे हा गुन्हा असून वाहन मालकावर सुद्धा कारवाई करण्यात येते. याकडे वाहन मालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.मात्र पाल्याच्या सुविधेसाठी पालक नियमांना बगल देत वाहन खरेदी करून देत आहेत. परिणामी, अल्पवयीन मुले शाळा, कॉलेज व ट्यूशन क्लासेसमध्ये वाहन घेऊन जाताना दिसतात.फक्त वाहन घेऊन जातानाच नव्हे तर ट्रीपल सीट व भरधाव वेगात वाहन चालवित जातात. विशेष म्हणजे, यात मुलेच नसून मुलींचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कानाला मोबाईल लावून मुलीही भरधाव वेगात वाहनाने जातात. यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 8:34 PM
वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने अपघाताच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून झालेल्या अपघात होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे.
ठळक मुद्देपालकांना सल्ला : अपघाताच्या संख्येत वाढ होण्यास कारणीभूत