गोंदिया : सध्या डेंग्यू व मलेरिया आपले पाय पसरत आहे. यामुळे साधी तापाची कण-कण जरी वाटली तरी मोफत रक्त तपासणी करून घ्या. कारण तापचे लवकर निदान झाले तर पेशंट गुंतागुंतपर्यंत जाणार नाही व तापजन्य आजाराने नाहक कुणी बळी पडणार नाही. यासाठी कुठलाही ताप अंगावर घेऊ नका, असे प्रतिपादन येथील केटीएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.
राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासनच्यावतीने शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरात आयोजित मोफत आरडीके व डेंग्यू मलेरिया जनजागृती कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मार्गदर्शक म्हणून पंकज गजभिये, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लिल्हारे व आईइसी समुदेशक नितू फुले उपस्थित होत्या. याप्रसंगी हुबेकर यांनी, आपला परिसर स्वछता ठेवा, कृत्रिम डास पैदास केंद्रे नष्ट करा व अडगळीचे सामान बाहेर काढा आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा त्यामुळे आपल्या नागरी वस्त्यातून डेंग्यूचा फैलाव होणार नाही, असे सांगितले. गजभिये यांनी नागरिकांना डेंग्यू व मलेरियाबाबत शास्त्रीय माहिती असलेल्या माहिती पत्रिका मलेरिया ऑफिसने वाटल्या. राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वॉर्डात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.