गोंदिया : महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा मलेरियासाठी इण्डेमिक क्षेत्र आहे. त्यामुळे मलेरियामुळे एकाही बालकाचा अथवा गर्भवतीचा मृत्यू होऊ न देणे हे आपले कर्तव्य आहे. बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दररोज शेकडो महिला व बाल रुग्ण उपचारासाठी येतात त्यांची देखील मलेरियासाठी स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, कोरोना व डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने कुठलाही ताप अंगावर घेऊ नका, असे प्रतिपादन केटीएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.
येथील बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात आयोजित राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम जनजागरण अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून मलेरिया विभागाचे पर्यवेक्षक पंकज गजभिये, बाल रोग कक्षाच्या स्वाती बन्सोड, दीपाली पाणतावणे, स्वाती बावणकर, लॅब टेक्निशियन प्रदीप ढोके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. हुबेकर यांनी, दररोजच्या ओपीडीतून सरासरी १५ टक्के रुग्णांची मलेरियासाठी मोफत रक्त तपासणी झालीच पाहिजे. त्यानंतर सध्या कोविड प्रतिबंधक उपाय म्हणून फिवर क्लिनिक सुरू आहे. फिवर क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची कोविड टेस्ट व डेंग्यू स्क्रिनिंग टेस्ट करून घेतली पाहिजे. कारण दोन्हीचे लक्षण सारखे दिसून येत आहे. मात्र डेंग्यूमध्ये रक्तकणिकांचे प्रमाण अतिशय कमी होते. आदिवासी दुर्गम भागातून बीजीडब्ल्यूमध्ये रेफर झालेल्या बालकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा व मोफत रक्त संक्रमण सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. कोरोना एपिडेमिक व डेंग्यू मलेरिया संभावित साथ याची दक्षता घेऊन प्रयोगशाळा निदान विभाग सुरू ठेवा. जेणेकरून वेळीच निदान केल्याने उपचार सुरू करण्यास विलंब होणार नाही. जून व जुलैच्या साथीच्या काळात बीजीडब्ल्यू येथे सर्व साथप्रतिबंधक औषधोपचारांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवावा, असेही निर्देश त्यांना फार्मासिस्ट नीलेश उईके यांना दिले.
----------------------
माहिती पत्रकाचे वितरण
डेंग्यूपासून बचावासाठी डॉ. हुबेकर यांनी, गोंदिया शहरातील नागरिकांनी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित करावा, परिसरात स्वच्छता राखावी, मच्छरदाणीचा वापर करावा, आठवड्यातून किमान १ दिवस कोरडा दिवस पाळावा व कुठलाही ताप अंगावर घेऊ नये, अशी माहिती दिली. तसेच याप्रसंगी मलेरिया विभागाचे आरोग्य पर्यवेक्षक गजभिये यांच्या हस्ते उपस्थित रुग्ण, पालक व पॅरामेडिकल स्टॉफ यांना मलेरिया व डेंग्यूबाबत माहिती पत्रक वितरीत करण्यात आले.