उद्विग्न शिक्षिकेचा सवाल : आंतरजिल्हा बदलीअभावी झाली वाताहातगोंदिया : ‘साडेतीन वर्षांपूर्वी लग्न झाले. पती तिरोड्यात आणि मी ४०० किलोमीटर अंतरावर यवतमाळ जिल्ह्यात सहायक शिक्षक म्हणून सेवा देत आहे. गेल्या तीन वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीतून गोंदियात येण्यासाठी प्रयत्न करीत आहे, पण अजून काहीच आशा दिसत नाही. असे किती दिवस ताटकळत राहायचे. आता ११ महिन्याच्या मुलीचे होणारे हाल पाहावत नाही. तरीही गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांना आमची किव येत नाही. आता कुटुंबासाठी माझ्यासारख्या अनेक शिक्षकांनी नोकरीच सोडायची का?’ असा उद्विग्न सवाल शुभांगी चौधरी या शिक्षिकेने केला. कुटुंबियांपासून दूर ४०० किलोमीटरवर यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील शिवणी या छोट्याशा गावात विद्यादानाचे काम करणाऱ्या शुभांगी चौधरी यांनी ‘लोकमत’जवळ आपली व्यथा मांडली. त्यांच्यासारखीच गोंदिया या आपल्या गृहजिल्ह्यात येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या शेकडो शिक्षक-शिक्षिकांची अवस्था आहे. पण २०१२ पासून एकाही शिक्षकाची आंतरजिल्हा बदली करण्यात आली नाही. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात शिक्षकांची एकही जागा रिक्त झाली नाही का? की शिक्षकांची ही व्यथा समजून घेण्याची मानसिकताच मनाने बधीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या यंत्रणेची नाही? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.शिक्षिका शुभांगी निळकंठराव चौधरी साडेतीन वर्षापूर्वी तिरोड्याच्या मनिष चाफले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. चाफले हे ठाणेगावच्या खासगी शाळेवर शिक्षक आहेत. पती-पत्नी एकत्रिकरण योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात बदली करण्यासाठी चौधरी यांनी तीन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविले. सर्व प्रक्रिया आटोपून त्यांनी आपली फाईल २० मे २०१३ रोजी गोंदिया जिल्हा परिषदेला सादर केली. पण शिक्षण विभागातील ‘बाबूगिरी’ने त्यांना अगदी निष्ठूरपणे टोलविले. अनेक वेळा विनंती केल्यानंतर, आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी सांगितल्यानंतरही कोणालाही त्यांची दया आली नाही. यातच त्यांच्या संसारवेलीवर निरागस मुलीच्या रुपाने एक गोंडस फूल उगवले. पण एका डोळ्यात बाळाचा आनंद तर दुसऱ्या डोळ्यात त्या बाळाचा सांभाळ कोण करणार या चिंतेने तरळलेले अश्रू, अशी त्यांची अवस्था झाली. मात्र आज ना उद्या बदली होणारच या आशेवर त्यांनी एवल्याशा बाळाला घेऊन ११ महिने काढले.एकीकडे सासूबाईंच्या निधनानंतर सुरू झाली पती व सासऱ्यांची आबाळ तर दुसरीकडे छोट्या मुलीला कधी शेजाऱ्यांकडे ठेवून तर कधी सोबत शाळेत घेऊन जाताना शुभांगी चौधरी यांची झालेली कसरत कोणाचेही मन हेलावेल अशीच होती. कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या छोट्या गावात लहान बाळाला घेऊन एकट्या राहताना बाळाचेही हाल झाले आणि हे बाळ आता कुपोषित झाले. ११ महिन्याचे हे बाळ अवघ्या ९ किलो वजनाचे आहे. त्याची ढासळलेली प्रकृती पाहता त्याला तिरोड्यात एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शासन आम्हाला पगार देते म्हणजे त्यात सर्वकाही आले असे नाही. आम्हालाही संसार आहे. आम्हालाही कौटुंबिक आधाराची गरज आहे. पण आमचे असेच हाल होणार असेल तर आम्ही नोकरीच सोडायची का? असा सवाल शुभांगी चौधरी यांच्याप्रमाणे सर्व शिक्षकांच्या मनात उठत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कोणते कर्तव्य पार पाडायचे?एकीकडे मातृत्वाचे कर्तव्य, दुसरीकडे सांसारिक कर्तव्य तर तिसरीकडे शैक्षणिक कर्तव्य अशा तिहेरी चक्रात फसलेल्या चौधरी यांच्यासारख्या अनेक शिक्षिकांना धड एकही कर्तव्य पूर्णपणे निभावणे कठीण जात आहे. पण निष्ठूर प्रशासकीय यंत्रणेला किंवा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही की काय, असा अनुभव आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना येत आहे.शिक्षक संघटना पुढाकार घेतील का?शिक्षकांच्या अनेक मागण्यांवर सरकारसोबत किंवा जिल्हा परिषद प्रशासनासोबत भांडणाऱ्या अनेक संघटना जिल्ह्यात कार्यरत आहेत. पण आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकांच्या व्यथा मांडण्यासाठी अद्याप कोणत्याही संघटनेने पुढाकार घेतला नाही. शेवटी या बदलीग्रस्त शिक्षकांनीच आंतरजिल्हा बदली कृती समितीची स्थापना करून आपल्या व्यथा मांडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. किमान या शिक्षकांचे, त्यांच्या कुटुंबियांचे हाल पाहून तरी इतर शिक्षक संघटना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येतील अशी अपेक्षा केली जात आहे.
कुटुंंबासाठी आता नोकरीच सोडायची का?
By admin | Published: November 20, 2015 2:19 AM