लोकमत विशेषैकपिल केकत गोंदियाबंद पडून असलेल्या धोटे सुतिका गृहाच्या जागेवर ‘डॉक्टर हाऊस’ साकारण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाची ही नवी संकल्पना असून यासाठी त्या जागेवर प्रशस्त कॉम्प्लेक्स तयार करण्यात येईल. या कॉम्प्लेक्स फक्त डॉक्टरांनाच भाडे तत्वावर जागा दिली जाणार असून शिवाय त्यांना दररोज काही तास शहरवासीयांना नि:शुल्क सेवा द्यावी लागणार अशी अट ठेवली जाणार आहे. याबाबत पालिकेच्या सभेत प्रस्ताव सादर केला जाणार असून त्यावर मंजुरी मिळाल्यावर आवश्यक ती प्रक्रिया केली जाणार. शहरातील महिलांसाठी नगरपरिषदेकडून धोटे सूतिकागृहाच्या माध्यमातून आरोग्याची सुविधा पुरविली जात होती. पूर्णपणे नगरपरिषद हे धोटे सूतिकागृह चालवीत असल्याने त्यात नगरपरिषदेवर आर्थिक भुर्दंड बसत होते. शासनाकडून काहीच मदत मिळत नसल्याने आर्थिक स्थिती बघता नगरपरिषदेला सूतिकागृह चालविणे कठीण झाले. परिणामी नगरपरिषदेने सन २०१० मध्ये सभेत तसा ठराव घेत सूतिकागृह कायमचे बंद केले. आजघडीला धोटे सूतिकागृह बंद असून सूतिकागृहाची इमारतही जीर्णावस्थेत अखेरच्या घटका मोजत आहे. सूतिकागृहाच्या या जीर्ण इमारतीमुळे मात्र सुमारे १०-१२ हजार स्क्वेअर फूट जागा अडून पडली आहे. अशात या जागेचा उपयोग व्हावा व त्यातून नगरपरिषदेला चार पैशांची आवकही व्हावी यासाठी नगरपरिषदेकडून त्या जागेवर काही नवा प्रयोग करण्याचा विचार केला जात होता. अशात सूतिकागृहाच्या त्या जागेवर आता ‘डॉक्टर हाऊस’ तयार करण्याची संकल्पना मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी मांडली. या संकल्पनेनुसार सूतिकागृहाच्या जागेवर नवे कॉम्प्लेक्स तयार केले जाईल. सूतिकागृहाच्या जागेवर हे कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असल्याने फक्त डॉक्टरांसाठीच ते असणार व यामुळेच ‘डॉक्टर हाऊस’ ही संकल्पना आली आहे. यासाठी शहरातील डॉक्टरांना बोलावून व त्यांचा सल्ला घेऊन कॉम्प्लेक्स तयार केले जाईल. तयार करण्यात येणाऱ्या कॉम्प्लेक्समधील एक हॉल नगरपरिषदेसाठी राहणार असून त्यातून नगरपरिषद स्वत:चे हॉस्पिटल (बाह्यरूग्ण सेवा) चालविणार. तर अन्य हॉल इच्छूक डॉक्टरांना भाड्यावर दिले जाणार आहे. सभेत लवकरच मांडणार प्रस्ताव पालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने मनमारून धोटे सूतिकागृह पालिकेला सन २०१० मध्ये बंद करावे लागले होते. त्याच जागेवर शहरवासीयांसाठी काही नवे करता यावे दृष्टीने ‘डॉक्टर हाऊस’ ही एक संकल्पना पुढे आली आहे. सध्या तरी ‘डॉक्टर हाऊस’ ही एक संकल्पनाच असली तरी या संकल्पनेला मुर्त रूप मिळवून देण्यासाठी पालिकेच्या बैठकीत लवकरच तसा प्रस्ताव मांडला जाणार आहे. मंजूरी मिळाल्यावर खऱ्या अर्थाने त्यावर कारवाई केली असून यासाठी वैशिष्ट़्यपूर्ण योजनेंतर्गत शासनाकडे निधीची मागणी केली जाणार आहे.
सूतिकागृहाच्या जागेवर साकारणार ‘डॉक्टर हाऊस’
By admin | Published: April 20, 2015 1:00 AM