विजय मानकर
सालेकसा : यंदा कोरोनाची दुसरी लाट आली अन् झपाट्याने अनेकांना मृत्यूच्या वाटेवर घेऊन गेली. दुसऱ्या लाटेत अनपेक्षितपणे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. परंतु सालेकसा तालुक्यात आरोग्य यंत्रणा नेहमी तत्परतेने सेवा देत असल्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण ठेवता आले. यामध्ये कोविड काळात अनेक डॉक्टरांनी रात्रंदिवस काम करून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. अनेक गंभीर रुग्णांसाठी तर डॉक्टर देवदूत बनून अवतरले म्हटल्यास वावगे होणार नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सालेकसा तालुक्यातील २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला. परंतु यापैकी कोणताही रुग्णाचा तालुक्यातील रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये मृत्यू झाला नाही. तालुक्यात आतापर्यंत एकूण २०८९ लोक पॉझिटिव्ह आले. यातील काही रुग्णांनी तालुक्याबाहेर नमुना चाचणी घेतली तर जास्तीत जास्त लोकांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि कोविड केअर सेंटरमध्ये चाचणी केली. कोविड पॉझिटिव्ह झाल्यावर काही खासगी डॉक्टरांनी खूप महागडा औषधोपचार दिला. त्याचा आर्थिक फटका रुग्णांना बसला. परंतु ज्या रुग्णांनी स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतला आणि कोरोना नियमांचा काटेकोर पालन केले. त्यामुळे सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनाचा संसर्गसुध्दा नियंत्रणात ठेवला. डॉ. दिनेश कटरे, डॉ. मोरध्वज लिल्हारे, डॉ. युवराज बैठवार, डॉ. शुभम पारधी यांनीसुद्धा दिवसरात्र सेवा देऊन रुग्णांवर उपचार केले. अनुभवी असलेल्या डॉ. सुरेखा मानकर यांनीसुध्दा २४ तास सेवा दिली.
......
३० रुग्णांना आणले मृत्यूच्या दारातून परत
कोविड केअर सेंटरमध्ये मागील तीन महिन्यांत एकूण ८५ कोविड रुग्णांना भर्ती करण्याची वेळ आली. त्यापैकी ३० रुग्णांवर सतत १४ दिवस पूर्ण औषधोपचार देऊन मृत्यूच्या दारातून परत आणण्याचे काम येथील डॉक्टरांनी केले आहे. ५५ रुग्णांना सुरुवातीचा पूर्ण औषधोपचार देऊन त्यांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. ८५ पैकी सर्व ८५ रुग्णांना कोरोनापासून मुक्त झाले. कोविड केअर सेंटरमध्ये डॉ. योगेश नागपुरे यांनी दररोज नियमित व ताबडतोब संशयित रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांची चाचणी केली.
............
आरोग्य विभागाचे योग्य नियोजन
डॉ. अमित खोडनकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून तालुक्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीवर सतत नजर ठेवून चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना नमुना चाचणी त्यानंतर औषधोपचार याचे योग्य नियोजन बनविले. कावराबांध येथील डॉ. राजू रघटाटे, डॉ. अफसर अली हे आरोग्य केंद्रात २४ तास सेवा देण्यास जराही मागे हटले नाही. दरेकसा येथील डॉ. रमेश गवली, डॉ. केतन माटे, बिजेपार येथील डॉ. भागवत, बारई, डॉ. प्रियंका प्रसाद आणि सातगाव येथे डाॅ. बी. डी. बोपचे यांनी सतत आरोग्य सेवा दिली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच तालुक्यात कोरोना नियंत्रणात आला. आज डॉक्टर्स डेनिमित्त सर्व देवदूतरूपी डॉक्टरांना सलाम.