शॉटसर्कीट ने लागली आग : वेळीच उपायाने आली आटोक्यात गोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील रहिवासी बालरोग तज्ज्ञ डॉ. सोमाणी यांच्या घरात रविवारी (दि.१५) दुपारी २ वाजतादरम्यान अचानक आग लागली. पायऱ्यांच्या खाली असलेल्या स्वीचबॉक्समध्ये झालेल्या शॉटसर्कीटमुळे ही आग लागली होती. मात्र अग्नीशमन विभागाच्या पथकाने वेळीच उपाययोजना केल्याने आग आटोक्यात आली. डॉ. सोमाणी यांच्या क्लिनीकला लागूनच शेजारी त्यांचे घर आहे. घरातील समोरच्या मोठ्या हॉलमध्ये त्यांची वाहने राहत असून तेथून वर जात असलेल्या पायऱ्यांखाली स्वीचबॉक्स आहे. तेथेच इन्हर्टर व त्यांच्या बॅटरी ठेवलेल्या आहेत. रविवारी (दि.१५) दुपारी २ वाजतादरम्यान अचानक स्वीचबॉक्समध्ये शॉटसर्कीट झाले व तेथे आग लागली. ही बाब लक्षात येताच लगेच अग्नीशमन विभागाला पाचारण करण्यात आले व त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा मोठी अप्रिय घटना घडू शकत होती. आग लागल्याची बातमी परिसरात पसरताच डॉ. सोमाणी यांच्या घरासमोर लोकांची एकच गर्दी लागली होती. (शहर प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या घराला आग
By admin | Published: January 16, 2017 12:17 AM