लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे २३ वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला. डॉक्टरांना सर्पदंश झाल्याचे सांगूनही त्याच्यावर योग्य औषधोपचार न करता त्यांनी रूग्णाला पेनकिलर व सलाईन लावले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. तसेच सदर डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.गोपाल उंदरुजी मेश्राम हा युवक शेतामध्ये काम करीत असताना त्याला सापाने दंश केला. सदर रुग्ण भोवळ आल्यामुळे तासभर जागीच पडून राहिला. मात्र रस्त्यावरून ये-जा करणाºयांना तो आढळल्याने त्यांनी त्याला उपचारासाठी वाहनाने खोडशिवनी येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्याला साप चावल्याचे तो सांगत होता. परंतु डॉक्टरांनी त्याला तसे इंजेक्शन न लावता सलाईन व पेनकिलरचे इंजेक्शन दिले. रुग्णाच्या तोडातून फेस निघत होता.सदर रूग्णाला सर्पदंशावर चालणारे इंजेक्शन लावा, असे गावकरी डॉक्टरांना सांगत होते. परंतु डॉक्टरांनी अरेरावीपणाची भाषा वापरून त्यांना अपमानित केल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. डॉ. महेश बेंबाळगे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथे कार्यरत असून ते योग्य उपचार करित नसल्याचा आरोप आहे. प्रसंगी शिवीगाळही करतात. त्यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे सदर युवकाचा झाला, असा आरोप गावकºयांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकावर वाहनासाठी फोन लावल्यानंतर त्यांनीसुद्धा उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीपमध्ये नेण्यात आले. गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेव्हा त्याला साप चावले आहे, असे सांगितल्या त्याला १५ इंजेक्शन केटीएसमध्ये देण्यात आले. परंतु रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करणे गरजेचे होते. परंतु जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू फुल्ल असल्यामुळे त्याला गोंदियातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु सापाचे विष त्याच्या मेंदुपर्यंत पोहोचल्याने २२ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.गावातील युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणा मुळे ही घटना घडली. त्यामुळे त्यांना पदमुक्त करा, अशी मागणी खोडशिवनीच्या ग्रामस्थांनी केली आहे..मी माझ्या पद्धतीने योग्य उपचार केला. तसेच १०८ ची गाडी ही वेळेवर पोहचू शकली नाही. त्यामुळे त्याचा इथेच अधिक वेळ गेला.-डॉ. महेश बेंबाळगेवैद्यकीय अधिकारी गट (अ)
प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथील संदर्भसेवा चिठ्ठीच्या अनुषंगाने असे समजते की बहुतेक साप चावला असावा. परंतु रुग्णाच्या शरीरावर साप चावल्याचे आढळून आले नाही. तपासणी दरम्यान सापाचे इंजेक्शन लावण्याची आवश्यकता नाही, अशी संदर्भ चिठ्ठीमध्ये नमूद आहे.-डॉ. विनोद भुतेवैद्यकीय अधिकारी, भरारी पथकजांभळी दोडके डव्वा, पीएचसी
रुग्णाच्या उजव्या पायाच्या टाचेला स्पष्ट सापाने चावल्याचे चिन्ह दिसत होते. हे सर्व दिसूनही वैद्यकीय अधिकारी यांनी ‘नो बाईट मार्क’ असे निदान केले. मी वैयक्तीक वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोललो, एएसव्ही दिले असते तर कदाचित रुग्ण दगावला नसता. त्यावर डॉक्टर बोलले १०८ ची गाडी आली नाही. त्यामुळे मी दिली नाही.-अशोक बिशन शेंडे,आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी.