लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर सर्वत्र भर दिला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, तर दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता १ मे पासून जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जात आहे. यासाठी पाच ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून शेड्यूल दिले जात आहे. मोबाइलवर लसीकरणाचे ठिकाण, दिवस, वेळ आदींची माहिती मिळाल्यानंतर नागरिक त्या ठिकाणी लसीकरणासाठी जात आहेत. मात्र, लस नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. दोन दिवसांपासून अनेक जण लस न घेताच केंद्रावरून परतत आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.
हा प्रकार खमारी प्राथमिक आरोग्य आणि कुडवा येथील उपकेंद्रावर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी राज्य सरकारकडून ५ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. हे डोस केवळ १८ ते २५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठीच आहेत. मग डोस उपलब्ध असूनसुद्धा नागरिकांना केंद्रावरून का परत पाठविले जात आहे, हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे.
कोणी काय करावे
६० वर्षांवरील नागरिक
६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच काही खासगी हॉस्पिटलमध्येसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यांनी ऑनलाइन नोंदणी करून आधारकार्ड घेऊन या केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे.
४५ वर्षांवरील नागरिक
कोरोना लसीकरण व्यापक स्तरावर व्हावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने एकूण १४० केंद्रांवरून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या केेंद्रावर जाऊन ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविन ॲपवर नोंदणी करून लस घेता येते.
१८ वर्षांवरील नागरिक
जिल्ह्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कुडवा उपकेंद्र, खमारी प्राथमिक आरोग्य, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली. को-विन ॲपवर नोंदणी करून दिलेल्या शेड्यूलनुसार या केंद्रावर जाऊन लस घेता येते.
जिल्ह्यातील सर्व १४० लसीकरण केंद्रांवरून लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून लसीकरणासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. त्यामुळे लसीकरणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे, तर १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी ५ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हळूहळू लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जाणार असल्याने मी को-विन ॲपवर नोंदणी केली. त्यानंतर शनिवारी कुडवा येथील लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा पहिला डोस घेतला.
- अजय कावळे, रामनगर
मी तीस दिवसांपूर्वीच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा पहिला डोस घेतला. आता १२ मे रोजी लसीचा दुसरा डोस घेणार असून, त्यासाठी नोंदणी केली आहे.
- देवचंद बागडे, कुडवा.
कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरच माझ्या मुलाने को-विन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार मी पहिला डोस फेब्रुवारी महिन्यातच घेतला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच कोरोनाचा दुसरा डोससुद्धा घेतला आहे.
- पुरुषोत्तम वाघमारे, ज्येष्ठ नागरिक.