गोंदिया : सध्या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्यांना लसीकरण केले जात आहे. यातंर्गत आतापर्यंत १० हजारावर नागरिकांना लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच रक्तपेढ्या आणि आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणापूर्वी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचा सल्ला दिला दिला जात आहे. जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ३५ रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. सिकलसेल, थॅलेसेमिया, रक्ताक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असून, रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, करे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. त्यात मागील वर्षीपासून कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. आधीच रक्तदाते कमी असून, त्यात कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे. अवघ्या राज्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता.
अशात येथील एकमेव शासकीय रक्तपेढीतही कित्येकदा रक्ताचा तुटवडा जाणवला होता. काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून येथील रक्तपेढीची गरज भागविण्यात आली. येथील एकमेव बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतूनच जिल्ह्यासह लगतच्या राज्यांतील गरजूंनाही रक्ताचा पुरवठा केला जातो.
.......
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
एनबीटीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाची लस घेणारी व्यक्ती त्यानंतर २८ दिवस रक्तदान करू शकणार नाही. म्हणजेच हजारोंच्या संख्येत लस घेणारे युवक रक्तदान करू शकणार नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वी सर्वांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा.
......
सध्या ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्यांना लसीकरण केले जात आहे. युवा वर्गाला अद्यापही लसीकरणास सुरुवात झाली नाही. त्यामुळे युवकांनी अशा स्थितीत स्वत:हून पुढे येऊन रक्तदान करावे असे रक्तपेढीकडून कळविण्यात आले आहे.
........
शासकीय रक्तपेढीत मोजकाच साठा
येथील शासकीय रक्तपेढीत दररोज ३० ते ३५ युनिट रक्ताची मागणी असते. शनिवारी येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील रक्तसंकलन केंद्रात १३९ युनिट रक्त शिल्लक होते. यामध्ये ए-पॉझिटिव्ह ३०, ए-निगेटिव्ह १, बी-पॉझिटिव्ह ४०, बी-निगेटिव्ह १, ओ-पॉझिटिव्ह ५५, ओ-निगेटिव्ह ०, एबी-पॉझिटिव्ह ११, एबी-निगेटिव्ह रक्त गटाची १ युनिट उपलब्ध होती.
......
दररोज किती जणांना दिली जाते लस
२,८७६
आतापर्यंत झालेले लसीकरण
११,२३३
जिल्ह्यातील एकूण ब्लड बँक
०३
....................
कोट
मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे रक्तदान नाहीच्या बरोबर होत आहे. परंतु रक्ताचा तुटवडा पाहून केलेल्या आवाहनामुळे सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले.त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता आला. आता कोरोनाचे लसीकरण होत आहे. या लसीकरणासाठी कोरोनाची प्रतिबंधित लस घेणाऱ्यांना २ महिन्यांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी लसीकरण करण्यापूर्वीच रक्तदान करावे.
-डॉ. संजय चव्हाण, रक्तपेढी प्रमुख
.......
कोरोना लसीकरणापूर्वी मी केले रक्तदान ()
मागील वर्षभरपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. त्यामुळे याचा रक्तदान शिबिरांवरसुध्दा परिणाम झाला आहे. तर आता कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळेच मी कोरोनाची लस घेण्यापूर्वी रक्तदान केले. कोरानामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होत असून सर्वांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे जेणेकरून गरजूंना वेळीच रक्त मिळण्यास मदत होईल.
- मेघश्याम सोनुले, रक्तदाता.