बोंडगावदेवी : आज घडीला समाज माध्यमातून विविध आकर्षित जाहिराती दिल्या जातात. त्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना स्वत:ची माहिती विचारली जाते. कोणाशी संवाद साधत असताना वैयक्तिक माहिती देऊ नये, त्यामुळे आपली फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अर्जुनी मोरगावचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी कळविले.
फसवणूक करण्याच्या नवनवीन तऱ्हा निघाल्या. आपल्या भ्रमणध्वनीचा सीम कार्ड बंद होत आहे, असा संदेश सांगून फसवणूक करण्याचा प्रकार घडत आहे. यात ऑफर म्हणून तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाते असे सांगून बँक खात्याची इत्थंभूत माहिती ओटीपी, क्युआर कोड पाठवून एसएमएस फारवर्डसारखे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून फसवणूक केली जाते. सध्या लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने बाहेर ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा होते. समाजमाध्यमावरील जाहिरातवर संपर्क साधून बुकिंग केले जाते. यात फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष खात्री करावी, फसवाफसवीच्या जाहिराती, संदेशापासून जनतेने सावध राहावे, असे अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव तोंदले यांनी कळविले.