लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा संसर्ग हा वृत्तपत्रांमुळे होत नसल्याचे आधीच स्पष्ट केले. वृत्तपत्रांमुळे कोरोनाची लागण होत नसून वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनामुक्त असल्याचे सांगितले आहे. वृत्तपत्रांच्या छपाई दरम्यान त्यावर सॅनिटायझेशन केले जाते. वृत्तपत्र विक्रेतेदेखील सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्यापासूनसुध्दा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र घरी बोलावून वाचन करावे.
.....
वृत्तपत्रामुळे कोरोना होतो ही बाब अद्याप पुढे आली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नसल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे. परंतु लोकांनी धास्तीने आपापल्या घरातील वृत्तपत्र बंद केलेत. अचूक माहितीसाठी वृत्तपत्र सगळ्यांनी वाचणे आवश्यक आहे. समाजात आजही वृत्तपत्र हे विश्वासार्ह माध्यम आहे. नियमित घरी वृत्तपत्र बोलावून बिनधास्तपणे वाचन करावे.
- सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या गोंदिया
वृत्तपत्रांपासून कोरोना होत नाही. वृत्तपत्र छापताना त्यांचे सॅनिटायझेशन व निर्जंतुकीकरण केले जाते. वर्तमानपत्रामुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना झाला असे एकही उदाहरण ऐकीवात नाही. मनात कसलाही संकोच व भीती न बाळगता प्रत्येकाने वृत्तपत्र वाचावे. आम्ही नियमित पेपरचे वाचन करून अचूक बातम्यांची माहिती करून घेतो.
- तेजेश्वरी गोवर्धन बिसेन, गृहिणी गोंदिया
कोरोनाच्या काळातही सेवा देणारे वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत मोडले. जगभरात आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती वर्तमानपत्रे देतात. छापून बाहेर पडणारे वृत्तपत्र सॅनिटाईझ करूनच येतात. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही तर फिजिकल डिस्टन्स न ठेवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. मनात कुठलीही भीती न बाळगता वृत्तपत्रांचे वाचन करावे.
- योगीता भुवन बिसेन, संचालिका शारदा कॉन्व्हेंट गोंदिया
सोशल मीडियामुळे अफवांचा बाजार सुरू झाला. परंतु अजूनही वाचकांचा १०० टक्के विश्वास वृत्तपत्रांमुळे टिकून आहे. अचूक व सविस्तर बातम्या ह्या वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. समाज जागृतीचे माध्यम असलेल्या वृत्तपत्रांचीच अफवा केल्यामुळे अनेकांनी वृत्तपत्र काही काळासाठी बंद केली होती. अनेकांनी आताही वृत्तपत्र सुरू केले नाही. आम्ही नियमित वृत्तपत्र वाचत असून वृत्तपत्रामुळे कोरोना होत नाही.
- भावना कदम, नगरसेविका गोंदिया
अचूक, उत्तम आणि सविस्तर बातम्या पुरविणारे वृत्तपत्र कोरोनापासून दूर आहेत. वृत्तपत्रापासून कोरोना झाल्याचे उदाहरण समाजात नाही. वृत्तपत्रांमुळे कोरोना झाला असता तर वृत्तपत्र बंद ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असते. सॅनिटाईझ करूनच वृत्तपत्रांचे वितरण केले जाते. त्यामुळे सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र वाचावे.
- माधुरी परमार, योग शिक्षिका