: जिल्ह्यात तंबाखूमुक्तीचा जागर
केशोरी : तंबाखूचे दुष्परिणाम आणि त्या दुष्परिणामांपासून नवीन पिढीला वाचविण्यासाठी तंबाखू व्यसन विरोधी जनजागरण व तंबाखूपासून दूर राहण्याची शपथ हा कार्यक्रम नवोदय विद्यालय व कनिष्ठ विद्यालयात मंगळवारी घेण्यात आला.
शासन परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था असायला पाहिजेत, त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे. भारत सरकारच्या कॉटपा कायद्यानुसार सर्वच शाळा, महाविद्यालये तंबाखूपासून मुक्त असावीत. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होऊ नये, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तंबाखूपासून दूर राहावे यासाठी शिक्षण मंत्रालय व आरोग्य मंत्रालय वारंवार काळजी घेत आहे व संदेश देत आहे. आरोग्य प्रबोधिनीचे डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी संस्थेद्वारा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध तंबाखूविरोधी घोषणा, तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू नियंत्रणाचे कायदे, शालेय तंबाखू मुक्ती उपक्रम यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली.
‘तंबाखू छोडो पैसा जोडो’, ‘तंबाखू म्हणजे खल्लास’, ‘नको पिऊ बिडी होईल देहाची काडी, बायकोला नेसवू नको सफेद रंगाची साडी’, ‘व्यसनात तू गुंतू नको, तंबाखू तू खाऊ नको’, ‘लांब पिचकारी तू टाकू नको, रस्त्यात तू थुंकू नको’ अशा घोषणा देण्यात आल्या. प्राचार्य काडगाये, नितीन लंजे, आरती पुराम यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.