गोंदिया : ऑनलाइनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. झटपट पैसा कमविण्याच्या नादात लोक एक-दुसऱ्याला गंडा घालत आहेत. आपला मोबाइल आपण कुणाच्या हातात देऊ नका; अन्यथा आपल्याला लोक सहजरीत्या गंडा घालतील. यापासून सावधान राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तीने फोन करण्याच्या नावावर आपल्याला मोबाइल मागितला तर देऊ नका; अन्यथा मोबाइलवर बोलण्याचे सांगून आपल्या मोबाइलवर ओटीपी मागवून तो ओटीपी नंबर घेतल्यास ते लोक आपली नजर चुकवून क्षणार्धात आपल्या खात्यातील सर्व रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेतील. आपण सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा. बसताना मोबाइल बाजूला ठेवू नका; अन्यथा आपल्या खात्यातील लाखो रुपये चोरून नेण्यासाठी शातिर चोरांना फक्त अर्धा मिनिट पुरेसा आहे. आपल्या खात्याशी आपला मोबाइल क्रमांक जोडलेला आहे. खाते क्रमांकाशी जोडलेल्या नंबरवर ओटीपी आल्यास तो ओटीपी नंबर घेऊन लोक आपल्या मोबाइलचा आधार न घेताच लाखो रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतील.
.........................................
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
१) कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन :
अनोळखी व्यक्तीने कॉल करण्यासाठी आपल्याला मोबाइल मागितल्यास त्याला आपला मोबाइल देऊ नका; अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.
२) वेगळी लिंक पाठवून :
आपल्या मोबाइलवर ते वेगळी लिंक पाठवतील. त्या लिंकवर क्लिक केल्यास आपल्या खात्यातील रक्कम वळती करू शकतात.
३) लॉटरी लागली आहे असे सांगून :
लॉटरी लागल्याच्या नावावर लोकांना लुटले जाते. कधी मेसेज तर कधी ई-मेल पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवितात.
४) केवायसीच्या नावावर लबाडणूक :
मी बँकेतून बोलतोय, आपल्या खात्याला केवायसी करायचे आहे. ओटीपी नंबर सांगा, असे खोटे बोलून लोकांना लुटले जाते.
...................................
ही घ्या काळजी-
१) अनोळखी व्यक्तीला आपला मोबाइल देऊ नका, कॉल आल्यास त्यावर माहिती देऊ नका, ओटीपी क्रमांक सांगू नका, फसव्या कॉलपासून सावध राहा. आपल्याला ई-मेल किंवा मोबाइलवर संदेश आल्यास डीलीट करा, प्रतिसाद देऊ नका.
....
२) कुणालाही आपली फायनान्सियल माहिती देऊ नका. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आलेली अनोळखी लिंक ओपन करू नका. संभाषण झाल्यास आपल्या संदर्भातली कुठलीही माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ नका; अन्यथा आपली फसवणूक होईल.
......
३) लॉटरी लागल्याचे आमिष देऊन अनेक महिला, पुरुषांची फसवणूक केली जाते. लोकांना महागड्या वस्तू लॉटरीत लागल्याचे आमिष देऊन त्यांची फसवणूक केली जाते. यापासून सावध राहण्याची गरज आहे.
..........................
कोट
अनोळखी व्यक्तीने आपला मोबाइल मागितल्यास त्याला आपला मोबाइल देऊ नका; अन्यथा आपल्या मोबाइलचा वापर चुकीच्या पद्धतीने करून लिंक किंवा ओटीपीच्या माध्यमातून आपल्या मोबाइलच्या साह्याने मदत मिळवून आपल्या खात्यातील पैसे चोरटे त्यांच्या खात्यात वळवतील. आपली फसवणूक होऊ नये म्हणून दक्ष राहावे.
- तेजस्विनी कदम, सायबर सेल प्रमुख