गोंदिया : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी व मळणी करून तो विक्री करण्यासाठी बाजारपेठेत आणला. मात्र जिल्ह्यात अद्यापही शासकीय धान खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १४३ केंद्रांना मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. केवळ धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून केंद्राचे उद्घाटन नको तर प्रत्यक्षात धान खरेदीला सुरुवात करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
शासनाने धानाला यंदा २१८३ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तर खरिपातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १४३ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. पण धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने काही निकष लावले असल्याने अद्यापही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. दिवाळीपूर्वी धानाची विक्री करून दिवाळी सण आनंदात साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
तर दिवाळी आणि पाडव्यातील गोडवा देखील हिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या दोन्ही विभागाने आठ दिवसात धान खरेदी सुरू करण्याची ग्वाही दिली होती. पण प्रत्यक्षात जिल्ह्यात अद्यापही एकही केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी आणि उधार उसणवारी फेडण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करून गरज भागवावी लागत आहे. मात्र यात त्यांना प्रतिक्विंटल मागे २०० ते ३०० रुपयांचे नुकसान सहन करावा लागत आहे.
पाच हजारावर शेतकऱ्यांनी केली नोंदणी
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर नोंदणी करण्यासाठी ज्या शेतकऱ्याच्या नावे सातबारा आहे त्याला केंद्रावर जाऊन ऑनलाइन फोटो अपलोड करून बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावावा लागत आहे. त्यातच जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने त्यांना नोंदणी करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
खरेदी केंद्रावर राहणार पथकांची नजर
शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील दोन-तीन वर्षात झालेला घोळ पाहता यावर्षी या केंद्रावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तर मुंबई आणि पुणे येथील अधिकाऱ्यांचे पथक सुद्धा धान खरेदी केंद्रांना भेटी देण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.
यंदा वाढली धान खरेदी केंद्राची संख्या
मागील वर्षीच्या तुलनेत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा १६६ वर धान खरेदी केंद्रांना मंजुरी देणार असल्याची माहिती आहे. यापैकी १४३ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. धान खरेदी केंद्राची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.