गोंदिया : कोरोनाविरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींचे डाेस दिले जात आहे. ज्यांनी पहिला डोस कोव्हिशिल्डचा घेतला त्यांना दुसरा डोस सुद्धा कोव्हिशिल्डचा दिला जात आहे. एकसारखेच डोस दिल्याने त्याची परिणामकारकता सुद्धा चांगली दिसून येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्डचा डोस घेतलेल्यांना दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा दिल्यास त्याची फारशी परिणामकारकता दिसून येण्याची शक्यता फार कमी आहे, तर असे वेगेवेगळे लसीचे डोस लावण्याची परवानगी किवा सूचना सुद्धा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेल्या नाही. कोरोना लसीचे काॅकटेल केले, तर त्याचे विपरित परिणाम सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर आयसीएमआरच्या सुद्धा यासंदर्भात कुठल्या मार्गदर्शक सूचना नाहीत, त्यामुळे कोरोना लसीचे कॉकटेल नकोच, असे मत जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तर जिल्ह्यात ज्या पहिला डोस कोव्हॅक्सिनचा दिला त्यांना दुसरा डोससुद्धा कोव्हॅक्सिनचाच दिला जात आहे. वेगवेगळे डोस देण्याचा प्रकार जिल्ह्यात कुठेच घडलेला नाही.
.......
तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात......
कोरोना प्रतिबंधात्मक लसींची निर्मिती ही कोरोनाच्या जीवाणूवर प्रयोगकरून करण्यात आली आहे. यशस्वी चाचणीनंतरच लस उपलब्ध झाली आहे. दोन्ही लसी वेगवेगळ्या असून, त्यांची परिणामकारकता सुद्धा वेगवेगळी आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांना कोव्हिशिल्ड लसींचा दुसरा डोस दिला जात आहे. वेगवेगळे डोस देणे योग्य होणार नाही.
- डॉ. सुवर्णा हुबेकर,
.......
कोरोनामुळे नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली आहे. याच सर्वच गोष्टी विचारात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे निर्मिती करण्यात आली आहे. आयसीएमआरच्या सूचनेनुसार ज्यांना ज्या लसीचा पहिला डोस दिला त्याच लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. त्याची परिणामकारकता सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे लसींचे काॅकटेल नकोच.
डॉ. भुमेश पटले
....................
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस दिली जात आहे. ज्यांना लसीचा पहिला डोस दिला त्यांना त्याच लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. लसीचे वेगवेगळे डोस दिल्यास त्याची परिणामकारकता दिसून येणार नाही. तसेच वेगवेगळे डोस लावण्यासंदर्भात अद्याप तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तशा सूचना नाहीत.
- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक
.......................
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण : २ लाख ४०,९३६
पहिला डोस : १ लाख ८९१८७
दुसरा डोस : ५१७४९
..................................
ज्येष्ठ नागरिक पहिला डोस - ६३३८७ दुसरा डोस -१६६२४
४५ ते ६० ८१८५१ १८४१८
१८ ते ४४ ११५५६
.........................
लसीकरणात ज्येष्ठ नागरिक पुढेच
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण एकूण १४० केंद्रावरून केले जात आहे. आतापर्यंत २ लाख ४० हजार ९३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यात ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर आहेत. ४५ ते ६० या वयोगटांतील एकूण ८१ हजार ८५१ नागरिकांनी कोरोनाचा डोस घेतला आहे.
.................