कपिल केकत
गोंदिया : दातांच्या समस्यांपासून लहान मुलेच काय तर मोठेही सुटलेले नाहीत. मात्र लहानपणापासूनच दातांची समस्या जडल्यास भविष्यातही जडतात. यामुळेच लहानपणापासूनच दातांची निगा राखणे गरजेचे आहे. आजच्या पिढीला चॉकलेट्स, बिस्कीट व जंकफूड-प्रोसेस्डफूडचा चस्का लागला असून दातांच्या समस्यांचे हेच मूळ कारण आहे. हे सर्व चिकट पदार्थ असल्याने ते दातांना चिकटून असतात. त्यात लहान मुले व्यवस्थितपणे ब्रश करीत नसल्याने येथूनच दातांना कीड लागणे व त्यापासून अन्य समस्यांची सुरूवात होते. म्हणूनच लहान मुलांना चॉकलेट्स व जंक फूड खाण्याची सवय नकोच असे लहान मुलांचे दंत चिकित्सक अक्षत अग्रवाल सांगतात.
-----------------------------
चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे !
- चॉकलेट्स, बिस्कीट व जंकफूड-प्रोसेस्ड फूड चिकट असल्याने ते दातांना चिकटून असतात व व्यवस्थित ब्रश न केल्यास येथूनच दातांच्या समस्यांची सुरूवात होते.
- शिवाय बाळांना अत्याधिक वेळ ब्रेस्ट फिडिंग करणे टाळावे. त्यातही रात्रीला दूध पाजल्यास ते बाळाच्या तोंडात राहते व त्यापासूनही दातांच्या समस्या सुरू होतात.
- महत्त्वाचे म्हणजे, ५ वर्षे वयापर्यंत पालकांनीच आपल्या पाल्यांना व्यवस्थित ब्रश करून द्यावा. जेणेकरून त्यांना याची सवय लागणार व दातांच्या समस्यांपासून ते वाचू शकतील.
--------------------------------
अशी घ्या दातांची काळजी
- चॉकलेट्स, बिस्कीट व जंकफूड खाऊच नये. एखाद्या वेळी खाणे ठिक असून खाल्ल्यानंतर गुळणा करावा. जेणेकरून दातांमध्ये अडकून असलेला पदार्थ निघून जाणार.
- दररोज दोन वेळा ब्रश करावा. यामध्ये रात्रीला नियमित ब्रश करणे अत्यंत गरजेचे असून आपण पालकांनी स्वत: ब्रश करून आपल्या पाल्यांनाही ब्रश करावयास लावावा.
-----------------------------------
लहानपणीच दातांना कीड
- लहान मुले चॉकलेट्स व बिस्कीट खातात व त्यानंतर व्यवस्थित ब्रश करीत नसल्याने दातांना किडींचा त्रास होतो.
- चॉकलेट्स, बिस्कीट व जंकफूड हे चिकट पदार्थ असल्याने ते दातांना चिकटून असतात व येथूनच दातांच्या किडींची सुरूवात होते.
- लहान मुले ब्रश करण्यासाठी आळस करतात, त्यामुळे खाल्लेले पदार्थ दातांमध्ये अडकून असतात व दातांच्या किडींची समस्या सुरू होते.
- दिवसा ब्रश केले जाते, मात्र रात्रीला ब्रश न केल्याने रात्रभर खाल्लेले पदार्थ दातांमध्ये अडकून असतात व किडींची समस्या वाढते.
-----------------------------------
दंतरोग तज्ज्ञ म्हणतात...
चॉकलेट, बिस्कीट व जंकफूडमुळे लहान मुलांना दातांच्या समस्या होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र यामुळेच आता लहान वयातच मधुमेह होत आहे ही गंभीर बाब आहे. यामुळे चॉकलेट, बिस्कीट व जंकफूड नकोच. शिवाय नियमित ब्रश व आपल्या दंत तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अक्षत अग्रवाल (लहान मुलांचे दंत तज्ज्ञ)
---------------------------
दातांच्या समस्यांपासून बचावासाठी सर्वप्रथम आपले खानपान व्यवस्थित ठेवावे. त्यातही प्रत्येकाने रात्रीला नियमित ब्रश करण्याची गरज असून ही सवय लहान मुलांनाही लावावी. याशिवाय दर ६ महिन्यांनी आपल्या दंत तज्ज्ञांकडून दातांची तपासणी करवून घ्यावी.
- डॉ. दीप बिसेन (दंततज्ज्ञ)