लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यावरून मागील आठ दिवसांपासून संभ्रम निर्माण झाल्याने निवडून आलेल्या भाजपच्या जि.प. सदस्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, शुक्रवारी (दि.५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता स्थापन होईल, काळजी करू नका, असा कानमंत्र सदस्यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या जि.प. सदस्यांची अस्वस्था काहीशी दूर झाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून मागील आठ ते दहा दिवसांपासून सस्पेन्स निर्माण झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या जि.प. सदस्यांची धाकधूक वाढली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचा आजवरचा इतिहास पाहता स्थानिक राजकारणामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापनेपासून दूर राहावे लागले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिकंल्या होत्या; परंतु बंगला आणि गल्लीच्या वादात त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. याच कारणामुळे भाजपच्या सदस्यांचा बीपी मागील आठ दहा दिवसांपासून वाढला होता; पण शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी जि.प. सदस्यांना चिंता करू नका, जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता स्थापन होणार, असे ठामपणे सांगितले. भाजप विचारसरणीच्या त्या दोन अपक्ष सदस्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. त्यांनी अनुकूलता दर्शविल्यानेच चंद्रकांत पाटील यांनी सदर वक्तव्य केल्याचे बाेलले जाते. भाजपचा एक ज्येष्ठ नेता बऱ्याच दिवसांनंतर त्यांच्यासोबत मंचावर होता, त्यावरून जि.प. मध्ये सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये होती.
आता लक्ष आरक्षणाकडे- जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जुनेच कायम ठेवायचे की नव्याने काढायचे यासंदर्भात ग्रामविकास मंत्रालयाकडून अभिप्राय मागविला आहे. त्याचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे तुझं माझं जमेना - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीच चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. केवळ पक्षाचे पदाधिकारीच चर्चा करीत आहे. स्थानिक नेत्यांमधील मतभेदांमुळेच या दोन्ही पक्षांना जि.प.मध्ये सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. या दोन्ही पक्षांची इच्छा एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची आहे. पण चर्चेसाठी पहिल पाऊल पुढे टाकेल कोण याचीच प्रतीक्षा सुरु आहे. त्यामुळे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था झाली. चाबी कुणाचे उघडणार कुलूप - जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष सदस्यांची मदत घ्यावीच लागणार आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विनोद अग्रवाल यांच्या चाबी पक्षाचे चार जि.प. सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. चाबीच्या मदतीने भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे कुलूप उघडणे सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.