शेतकरी सुखावला : पिकांना मिळणार जीवनदान लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : सध्या मान्सून दडी मारुन बसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीची कामे पावसाअभावी पूर्णपणे खोळंबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या आहेत. दडी मारुन बसलेला पाऊस कधी बरसेल याचीच वाट बघत राहावी लागत आहे. अशात मात्र पिकांसाठी सिरपूर धरणाची दारे उघडण्यात आली असून यामुळे पिकांना जिवदान मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन आहे त्यांनी कशीबशी रोवणीची कामे सुरु केली. पण त्या स्त्रोतांनी पाण्याची पातळी खालावल्याने शेताला पुरेसे पाणी मिळत नाही. परिसरात वाघ नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांनी विद्युत पंपाद्वारे पाणी ओढून शेतीची कामे सुरु केली. परंतु नदी सुध्दा कोरडी पडत चालल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाअभावी सिरपूर जलाशय सुद्धा कोरडा असल्याने शेतकऱ्यांना मुबलक पाणी पुरवठा करणे सुध्दा शक्य नाही. असे असताना मात्र, नदी काठा जवळील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळावे या करीता आमदार संजय पुराम यांच्या आदेशावरुन सिरपूर जलाशयाचे पाणी शनिवारी (दि.८) दुपारी सोडण्यात आले. या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतपिकांना निश्चितच काही प्रमाणात फायदा होईल. शेतकऱ्यांनी आ. संजय पुराम यांना सिरपूर जलाशयातून पिकांना पाणी मिळावे यासाठी विनंती केली असता तत्काळ दखल घेत आमदारांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिले.
परिसरातील पिकांसाठी सिरपूर धरणाचे दार उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 12:44 AM