लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदेशातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.१०) विदेशातून परतलेल्या ६ जणांसह गोरेगाव तालुक्यातील १ अशा एकूण ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच दिवशी ७ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांचा आकडा २०२ वर पोहचल्याने कोरोना बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. मात्र १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.मागील १०-१२ दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने गेल्या ८ दिवसांच्या कालावधीतच ६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे दुबई येथून परतलेले आहेत. शुक्रवारी आढळलेल्या एकूण ७ रुग्णांमध्ये कतार येथून आलेल्या ६ आणि गोरेगाव तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कतार येथून आलेले ६ जण हे तिरोडा तालुक्यातील रहिवासी असून ते रोजगारासाठी तिथे गेले होते. ते २ दिवसांपूर्वीच जिल्ह्यात परतले. त्यानंतर त्यांना गोंदिया येथील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.शुक्रवारी या ६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तर १ कोरोना बाधित हा गोरेगाव तालुक्यातील ग्राम भंडगा येथील आहे. या ६ जणांचा इतर नागरिकांशी संपर्क आला नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका टळला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले १२ कोरोना बाधित शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०२ कोरोना बाधित आढळले. यापैकी १४२ कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे.तर सद्यस्थितीत एकूण ५८ कोरोना अॅक्टीव रूग्ण आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही थोडी दिलासादायक बाब आहे.४८९६ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ५३५७ स्वॅब नमुने येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २०२ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ४८९६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १९७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. ६२ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे.संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनाजिल्ह्यात मागील १०-१२ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनाने कंटेन्मेंट झोन घोषीत केला आहे. जिल्ह्यात एकूण १७ कंटेन्मेंट झोन असून यामध्ये अतिजोखमीच्या इतर आजारांच्या रुग्णांची तपासणी करुन संसर्ग टाळण्यासाठी ९८ चमू आणि ३४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचे द्विशतक पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM
मागील १०-१२ दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने गेल्या ८ दिवसांच्या कालावधीतच ६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे दुबई येथून परतलेले आहेत.
ठळक मुद्दे१२ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : जिल्ह्यात ५८ कोरोना अॅक्टीव्ह रूग्ण