पालकमंत्र्यांची खंत : चिचगड येथे भीम मेळावागोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हावा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र दिला. त्यांना या देशात धर्मनिरपेक्ष समाज रचना निर्माण करायची होती. १९५६ मध्ये बुध्द धम्माचा स्विकार करून त्यांनी समाजाच्या प्रगतीचे स्वप्न बघितले. परंतू त्यांना अभिप्रेत असलेला समाज आजवर निर्माण झाला नाही, अशी खंत पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्ती केली.देवरी तालुक्यातील चिचगड येथील भीमभूमीवर रविवारी बौध्द समाज संस्था चिचगडच्या वतीने आयोजित भीम मेळाव्यात अध्यस्थानावरून बडोले बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन खा.अशोक नेते यांनी केले. आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद सदस्य अलताफभाई हमीद, उषा शहारे, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, किसन जांभूळकर, नरेंद्र शहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, समाजातील ९० टक्के लोक भूमीहीन आहेत. देशातील ओबीसी, एससी व एसटी हा समाज मागास नसला पाहिजे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. आजही त्यात फार बदल झालेला नाही. मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांसाठी बाबासाहेबांनी त्या काळात आंदोलने केली. आरक्षणामुळे समाजाची स्थिती फार मोठी बदललेली नाही. दारिद्रयरेषेखाली राज्यात एससी एसटीची संख्या मोठी आहे. शिक्षणामुळेच समाजाची प्रगती शक्य आहे. भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी बांधवांसाठी प्रथम तरतूद केली. त्यानंतर एससी व एसटी प्रवर्गासाठी केली, असे सांगून बडोले म्हणाले, सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारली तरच प्रगती होईल. हे केवळ शिक्षणामुळेच शक्य आहे. भीमभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण छत्तीसच्या छत्तीसही योजनेतून जास्तीत जास्त मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही पालकमंत्री बडोले यांनी दिली. उद्घाटक म्हणून बोलताना खा.नेते म्हणाले, येथील भिमभूमीच्या बांधकामासाठी १० लक्ष रु पये निधी देण्यात येईल अशी घोषणा केली. आमदार पुराम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचा मी पाईक आहे. समाजाने पोटजातीत भेदभाव करु नये. आदिवासी व दलीत बांधवांचा विकास झाला पाहिजे. कोणत्याही धर्मावर टिका करु नका असे सांगून भीमभूमीच्या बांधकामासाठी ५ लक्ष रुपये निधी देणार असल्याचे पुराम यांनी सांगितले. महापुरुषांचे पुतळे गावोगावी उभारण्यापेक्षा त्यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे म्हणाल्या. या कार्यक्रमाला देवरीसह अन्य तालुक्यातील बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत समाज निर्माण झाला नाही
By admin | Published: March 01, 2016 1:10 AM