अर्जुनी मोरगाव : राज्यात महाआघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षपूर्तीच्या निमित्ताने जिल्ह्यात महाआवास योजनेंतर्गत ४५ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
‘घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून’ अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. दोन्ही बाबी खर्चाच्या दृष्टीने अगदी महागड्या आहेत. गोरगरिबांच्या तर हे आवाक्याबाहेरचे. या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागतात. त्यामुळे महाआघाडी सरकारने वर्षपूर्तीच्या निमित्ताने घेतलेला हा निर्णय गोरगरिबांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जात आहे. या योजनेत जिल्ह्यात तालुकानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही घरकुलं शंभर दिवसांत पूर्ण करावयाची असल्याने यंत्रणा कामाला लागली आहे. घरकुलांच्या मंजुरीनंतर संबंधित लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. गोंदिया तालुक्यात तर अनेक कामे प्रगतिपथावर असून, सुमारे ८० लाभार्थ्यांना दुसरा हप्ताही देण्यात आला आहे.
.....
लोकहिताचा स्तुत्य निर्णय
राज्यात महाआघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या स्वप्नपूर्तीसाठी घेतलेला हा निर्णय स्पृहणीय आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४५ हजार नवीन घरकुलांचे बांधकाम होणार असून, या कल्याणकारी निर्णयाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी ‘लोकमतला’ दिली.