अर्जुनी/मोरगाव : मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. लायनिंगला तडे जावून पाळ फुटल्यांचे बोलल्या जात आहे.प्राप्त माहितीनुसार, तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. रोवणी झाल्यानंतर शेतात पाणी नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. इटियाडोह पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कालव्यातून पाणी सोडले. या कालव्यांची पाणी वहन क्षमता १४०० क्युसेक्स आहे. धरणातून कालव्यात ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. या धरणाचे लाभक्षेत्र भंडारा जिल्ह्यातील बारव्हापर्यंत ७२ किमी आहे. या शेवटच्या टोकावर कालव्याचे पाणी पोहोचत नाही म्हणून पाणीवापर संस्थेने विभागाकडे १ हजार क्युसेस पाणी सोडल्याचा आग्रह धरला.कालव्यातून ११०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी (२२) सकाळी १२ वाजताच्या सुमारास पाळ खचत असल्याची माहिती शाखा अभियंता चौरागडे यांना मिळाली. त्यांनी त्याचक्षणी धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. बघता बघता निकृष्ट असलेले लायनिंग तुटले व सुमारे १० मीटर पर्यंतच्या पाळीला भगदाड पडले. कालव्यानजीक असलेल्या चिंतामण ठाकरे, चैतराम कलारी, आनंदराव कलारी, फागो कलारी, बुद्धी साफा, किसन वाळवे, बळीराम नेवारे व डोंगरे माहुरकुडा या शेतकऱ्यांचे सुमारे १४ एकर शेतीत पाणी घुसले. पाणी पसरण्यासाठी जागा नसल्याने शेतात घुसलेले पाणी परत कालव्याकडे येत आहे. हा कालवा बंद झाल्यानंतर पुर्णत: बंद व्हायला सुमारे १८ तास लागतात. त्यामुळे साचलेल्या पाण्यात धानपीक काही प्रमाणात सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने २०१० मध्ये कालव्याच्या काही भागात सिमेंट काँक्रिटचे लायनिंगचे काम झाले आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने कालवा फुटला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. विशेष उल्लेखनिय म्हणजे मातीकाम असलेल्या ठिकाणी ही पाळ न फुटता सिमेंट काँक्रिटने तयार केलेल्या आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कालव्याच्या पाळीला छिद्र असल्याची बाब उन्हाळ्यात संबंधित विभागाला सांगण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा केल्यामुळे ही घटना घडण्याचे शेतकरी सांगतात. घटनास्थळाला उपविभागीय अभियंता राठोड, शाखा अभियंता दिलीप चौरागडे यांनी भेट देऊन पाहणी केली. धरणाचे पाणी बंद करण्यात आले. ते उद्या (दि.२३) दूपारपर्यंत पुर्णत: बंद होईल व फुटलेल्या ठिकाणी विभागाला दुरुस्तीकाम करणे सुलभ होईल. हे काम दोन दिवसात पुर्ण होईल अशी अपेक्षा इटियाडोह पटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
कालव्याची पाळ फुटल्याने शेतात पाणीच पाणी
By admin | Published: August 23, 2014 1:53 AM