गोंदिया : एसटी महामंडळातर्फे गाव तेथे एसटी पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावातील प्रवाशांची सोय व्हावी व प्रवाशांना रात्री उशिरा का असेना पण आपल्या घरी पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळातर्फे जिल्ह्यातील २० ठिकाणी मुक्कामी बस फेऱ्या होत आहेत. यात काही ठिकाणी चालक-वाहकांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी चालक-वाहकांना झोपण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांना बस मध्येच रात्र काढावी लागते. कोरोनाने संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोनाआधी गावातील माणसे चालक-वाहक यांना मदत करीत होते. मात्र आज कोरोनानंतर ही परिस्थिती बदलली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. अनेक प्रवाशांशी एसटी कर्मचाऱ्यांचा संपर्क येत असल्याने कोरोनाची भीती गावकऱ्यांमध्ये असते.
त्यामुळे ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळा अशा ठिकाणी चालक, वाहक यांच्या झोपण्याची व्यवस्था होत नाही. मात्र असे असले तरीही अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचाही अनुभव येत आहे. गोरेगाव तालुक्यातील ग्राम जांभळी हा परिसर जंगलव्याप्त असून येथे चालक-वाहकांची सोय नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो असे चालक-वाहकांनी सांगितले.
--------------------------
अंघोळीसह शौचालयाची होते अडचण
ग्रामीण भागात मुक्कामी बसफेऱ्या घेऊन जाणाऱ्या चालक-वाहकांना एसटीचा हक्काचा निवारा नसल्याने ग्रामपंचायतची मदत घ्यावी लागते. मात्र काही ग्रामपंचायतमध्ये सहकार्य मिळत नसल्याने एसटीच्या मुक्कामी चालक-वाहकांना शौचालय व अंघोळीसाठी अडचणी येतात. अशा वेळी दिवसभर वणवण केलेल्या कर्मचाऱ्यांना रात्रीही ताज्या जेवणासह, वैयक्तिक स्वच्छता व पुरेशी झोप मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
----------------------
कोरोनामुळे मदतीसाठी गावकरीही पुढे येईनात
कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. मात्र तरीही एसटीच्या बस सेवा सुरू आहेत. अशावेळी चालक-वाहकांचा प्रवाशांची अनेकदा संपर्क येतो. त्यामुळे पूर्वी रात्री गावात मुक्कामी बस असलेल्या ठिकाणी नागरिकांची एसटीच्या कर्मचाऱ्यांना मदत मिळायची. मात्र आता कोरोनानंतर हे चित्र बदलले आहे. पूर्वी मदतच नाही तर जेवण व चहापाणी याव्यतिरिक्त अंघोळ तसेच स्वच्छतेसाठी मदत हवी असली तरीही लोक करायचे मात्र. आज हे चित्र दिसत नाही.
-------------------
जुन्या बसमध्ये होती झोपण्याची सोय
पूर्वीच्या गाड्यांमध्ये झोपता येत होते, तशा सीट होत्या, मात्र आताच्या नवीन गाड्यांमध्ये तशा सीट नसल्याने चालक-वाहकांना झोपता येत नाही. अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे चालक-वाहकांना मुक्कामी ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या जांभळी येथे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- शाहीद शेख, अध्यक्ष, एसटी कर्मचारी संघटना, गोंदिया.
------------------------
गोंदिया आगारातील २० बसेस मुक्कामी राहतात. यातील २० चालक व २० वाहकांची सोय करावी लागते. यासाठी आम्ही ग्रामपंचायला पत्र देऊन त्यांच्याकडून सोय करवून घेतो. त्यानुसार कित्येक ग्रामपंचायतकडून सहकार्य केले जाते. तर काहींकडून सहकार्य मिळत नाही. अशात आम्हाला तेथील मुक्कामी बस बंद करावी लागते. जांभळी येथील तक्रार आल्यावर तेथे लगेच पत्र दिले आहे.
- संजय पटले, आगार प्रमुख, गोंदिया
---------------------
सध्या काही ठिकाणी समस्या आहे. किमान झोपण्यासाठी व अंघोळीसाठी तरी हक्काचा निवारा हवा. यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकाराची गरज आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही सेवा देतो. अशात आमच्या रात्रीच्या मुक्कामासाठी तरी सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांनीही थोडेफार सहकार्य केल्यास ही समस्या सुटू शकते.
- चंद्रकांत तुरकर
एसटी चालक, गोंदिया.
सध्या जांभळी येथेच समस्या असून काही ठिकाणी थोड्याफार समस्या येतात. अशात ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन एसटीच्या चालक-वाहकांसाठी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून प्रवाशांसाठी कर्तव्य निभावतो. यामुळे मुक्काम असलेल्या गावातील सरपंचांनी एसटी चालक-वाहकांसाठी लक्ष द्यावे.
- केशव व्यास
वाहक, गोंदिया.
--------------------
- रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेस- २०
-मुक्कामी थांबावे लागतात असे चालक- वाहक
- चालक-२०
- वाहक- २०