गोंदिया: दररोज दारू पिऊन आई-वडिलांच्या मागे कटकट लावणे, दारूसाठी त्यांचा छळ करणे या नेहमीच्याच कटकटीमुळे संतापलेल्या बापानेच आपल्या मुलावर कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले. देवरी तालुक्यातील ग्राम मुल्ला येथे शनिवारी (दि.१७) रात्री १० वाजता दरम्यान ही घटना घडली. हंसराज उर्फ पिंटू नारायण मुनेश्वर (३०, रा. मुल्ला) असे मृताचे नाव आहे.
मृत हंसराज मुनेश्वर हा दारूचा व्यसनी होता. शनिवारी (दि.१७) रात्री ९ वाजताच्या सुमारास तो दारु पिऊन घरी आला. दारुच्या नशेत त्याने वडील नारायण कारू मुनेश्वर (५५, रा. मुल्ला) यांना आणखी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावररून बाप-लेकांमध्ये भांडण झाले. नेहमीच्या या वादाला कंटाळलेल्या नारायण मुनेश्वर यांनी अखेर रागाच्या भरात पिंटूवर धारदार कुऱ्हाडीने घाव घालून त्याला जागीच ठार केले.
दारूसाठी पैसे मागणे व घरात धिंगाणा घालणे हा प्रकार पिंटूचा नित्याचाच झाला होता. त्याच्या या प्रकारामुळे आई-वडील दोघेही त्रस्त होते. नेहमीच्या कटकटीमुळे त्या आई-बापाचे जगणे कठिण झाले होते. आई-वडिलांना मारहाण करणे, आजीला मारहाण करणे हे कृत्य हंसराज दररोज करीत होता. यातूनच नारायण मुनेश्वर यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे........आईने पोलिस पाटलांना दिली पहाटे माहिती- रविवारी (दि.१८) पहाटे ५ वाजता हंसराजची आई कमला मुनेश्वर ही पोलिस पाटील ललीता भूते यांच्या घरी रडत गेली. गावातील चौकात कृपासागर गौपाले यांच्या घरासमोर हंसराज पडलेला आहे असे तिने सांगीतले. पोलिस पाटील चौकात कृपासागर गौपाले यांच्या घरासमोर भूते गेल्या असता तेथे हंसराज हा तोंडाच्या भारावर रक्त व चिखलाने माखलेल्या स्थितीत पडून होता. त्याने अंगात फुलपॅन्ट घातलेला होता. डोक्यातून रक्त वाहत होते. पोलिस पाटील भूते यांनी याबाबत लगेच बिट अंमलदार बोपचे व ठाणेदारांना माहिती दिली........असा केला गुन्हा दाखल- हंसराज मुनेश्वर या दारूड्या मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्या नारायण मुनेश्वर याच्याविरूध्द पोलिस पाटील ललीता देवराज भुते (४३) यांनी तक्रार केली. या तक्रारीवरून १८ ऑगस्ट रोजी देवरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद केला आहे..........चार तास टाळाटाळ; श्वान अंगावर येताच दिली कबुली- या प्रकरणातील आरोपी नारायण मुनेश्वर हंसराजच्या खुनाशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हणत होता. तब्बल चार ते पाच तास विचारूनही तो खुनाची कबुली देत नव्हता. अशात पोलिसांनी गोंदियावरून श्वानपथकाला पाचारण केले. यावर पोलिस हवालदार विक्रम सदतकर हे त्यांचा श्वास ‘बॉब’ याला घेऊन पोहचले. बॉबला तेथील दगडाचा वास दिला असता बॉल थेट नारायण मुनेश्वर यांच्या जवळ गेला त्यांच्या अंगावर जाताच नारायण यांनी आपणच खून केल्याची कबुली दिली.