पाण्याची पातळी ७० टक्के पर्यंत खाली : उन्हाळ्यात भासणार पाणी टंचाई केशोरी : गावालगत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात बोअर करुन पाण्याचा स्त्रोत निर्माण केला. उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने गावातील विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन कोरड्या पडण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रुप धारण करु पाहत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन धान पिकासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे रबी पिकाची लागवड केली आहे. गावालगत जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअर मारुन २४ तास विद्युत मोटार चालू राहील. या अपेक्षेने पाण्याचा स्त्रोत निर्माण करुन पाण्याचा उपसा करण्याचा सपाटा सुरु केला आहे. पावसाळी धान पिकापेक्षा रबी धान पिकाचे उत्पन्न जास्त होत आहे. या भागातील शेतकऱ्यांचा कल उन्हाळी धानपिकाकडे जास्त आहे. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यापर्यंत गावातील विहिरीचे पाणी मिळणे आवश्यक असते. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्के पर्यंत कमी झाली आहे. सध्या फेबु्रवारी महिना सुरु आहे. उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटायला लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रकरणी कृषी विभागाने विशेष लक्ष घालून रबी पिकासाठी लागणारा आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा न करता पाण्याचा योग्य वापर करुन रबी धानपीक काढण्याचा शिबिराचे आयोजन करुन सल्ला द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)
रब्बी पिकांमुळे विहिरी पडू लागल्या कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 1:11 AM